Satara Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : मेडिकल कॉलेजला 14.5 कोटींचा निधी; 80 टक्के काम पूर्णत्वाकडे

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : सातारा शासकीय मेडिकल कॉलेजचे आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असून, नुकताच १४.५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत कॉलेजच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत नवीन इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे.

सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतन इमारतींचे बांधकामही सुरू असून, आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. एकूण ४९५ कोटींचा हा कामाचा आराखडा आहे. यामध्ये महाविद्यालयाची मुख्य इमारत, सुसज्ज ऑपरेशन थेटर, निवासी इमारती, मुले व मुलींचे वसतिगृह, अधिकाऱ्यांची निवासस्थाने आदींचा समावेश आहे. साताऱ्यातील कृष्णानगर येथील नियोजित जागी बांधकाम सुरू आहे. मध्यंतरी या बांधकामांना निधी वेळेवर उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे या कामांना गती मिळत नव्हती. सुरुवातीला केवळ ७० कोटींचाच निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घातल्याने २०० कोटींचा निधी उपलब्ध झाला. आतापर्यंत या मेडिकल कॉलेजचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुख्य इमारत, मुला, मुलींची वसतिगृह, लेक्चर हॉल, प्रयोगशाळा आदींचा समावेश आहे.

मेडिकल कॉलेजच्या कामाला निधी अडखळत उपलब्ध होत आहे. त्यामुळे या कामावरील कामगारांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आता पुन्हा एकदा १४.५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आता ८० टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्णत्वाकडे जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. साधारण जानेवारी २०२५ मध्ये नूतन इमारतीत कॉलेज सुरू होण्याची आशा आहे.

दुसरा टप्प्याचे काम सुरू होणार

मेडिकल कॉलेजचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठीही निधीची उपलब्धता केली जात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तयार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन जानेवारीपासून दुसरा टप्प्याचे काम सुरू होणार आहे.