garbage Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Municipal Council : घनकचरा ठेकेदार पालिकेवर मेहरबान?

ना नफा-ना तोटा तत्त्वावर काम करणार संस्था

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : सोनगाव येथील कचरा डेपोत घनकचरा व्‍यवस्‍थापनाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत न टाकता पालिकेने त्‍याच्‍याच संमती, पसंतीने पुणे येथील एका संस्‍थेस ते काम दिले. ना नफा-ना तोटा या तत्त्वावर कर्मचारी उपलब्‍ध करून हे काम करण्‍यासाठीचे पत्र पालिकेने त्‍या ठेकेदारास दिले आहे. ना नफा- ना तोटा तत्त्वावर काम करणारी संस्‍था, तसेच तिचे कर्तेधर्ते पालिकेवर एवढे का मेहरबान झाले? याविषयीची सातारकरांची उत्‍सुकता वाढली आहे.

शहर व परिसरातील कचऱ्याचे संकलन केल्‍यानंतर त्‍यावर सोनगाव येथील कचरा डेपोत पालिकेच्‍या वतीने प्रक्रिया करण्‍यात येते. या कामाचा ठेका पालिकेने इंदूर येथील ईको सेव्‍ह लॅबला दिला होता. कामादरम्‍यान प्रशासकीय विसंवाद, तांत्रिक-अतांत्रिक कारणांमुळे ईको सेव्‍हने डेपोतील काम बंद केले. काम अर्धवट सोडल्‍याने पालिकेने त्‍या कंपनीस काळ्या यादीत टाकण्‍याची प्रक्रिया करणे आवश्‍‍यक होते. मात्र, पालिकेने ती कारवाई न करता सुवर्ण मध्‍य काढण्‍या‍च्या हालचाली सुरू केल्‍या.

पालिकेने ईको सेव्‍ह या कंपनीने नेमलेल्‍या संस्‍थेस काम सुरू करण्‍यासाठी चाल देण्‍याच्‍या हालचाली सुरू केल्‍या. यासाठीचा ठराव पालिका प्रशासकीय सभेत घेत त्‍यानुसार हे काम पुणे येथील शिवसाई एंटरप्रायझेसला दिले. यासाठी पालिकेने शिवसाई एंटरप्रायझेसला पत्र दिले आहे. यात पालिकेच्‍या सोनगाव डेपोतील घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पांतर्गतील घनकचरा वर्गीकरण करून ना नफा - ना तोटा या तत्त्वावर कर्मचारी उपलब्‍ध करावे, अशी सूचना केली आहे. ना नफा - ना तोटा या तत्त्वावर काम करण्‍यासाठी पुढाकार घेत पालिकेच्‍या मदतीला कोणत्‍याही इतर अवघड प्रशासकीय कार्यवाहीशिवाय धावून आलेल्‍या शिवसाई एंटरप्रायझेसविषयी सातारकरांना कमालीची उत्‍सुकता आहे.

पुरवठादारांचे हेलपाटे...
सोनगाव येथील कचरा डेपोतील कामासाठी ईको सेव्‍ह लॅबने आवश्‍‍यक मनुष्‍यबळ, तसेच यंत्रणा स्‍थानिक पातळीवरून घेतली होती. या कंपनीने काम बंद केल्‍याने स्‍थानिक पातळीवरील छोट्या- मोठ्या सेवासुविधा पुरवठादारांचे लाखो रुपये अडकून आहेत. अडकलेले पैसे मिळावेत, यासाठी पुरवठादार दररोज पालिकेत हेलपाटे मारत आहेत.

चार दिवसांत पत्र...
घनकचरा व्‍यवस्‍थापनाचे काम करण्‍यास इच्‍छुक असल्‍याचे पत्र शिवसाई एंटरप्रायझेसने ८ डिसेंबरला पालिकेला दिले होते. हे पत्र मिळाल्‍यानंतर अवघ्‍या चार दिवसांत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत पालिकेने शिवसाईला १२ डिसेंबरला काम करण्‍याचे पत्र दिले आहे.