Hatkanangale Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

टेंडरच्या तक्रारींमुळे अधिकाऱ्यांची उडाली झोप

फर्निचर टेंडरने अधिकारी त्रस्त; बांधकाम विभागाकडून खुलासा सादर

टेंडरनामा ब्युरो

कोल्‍हापूर (Kolhapur) : विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता असतानाही हातकणंगले (Hatkanangale) पंचायत समितीच्या फर्निचर कामासाठी मागच्या तारखेत कागदपत्रे सादर केल्याची तक्रारी जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या तक्रारीची चौकशी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्याकडे देण्यात आली असून, त्यांनी बुधवारी हातकणंगले पंचायत समितीस भेट देवून याबाबतची वस्‍तुस्‍थिती जाणून घेतली. ते आपला अहवाल दोन दिवसात सादर करणार आहेत. दरम्यान या टेंडरच्या तक्रारीमुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे. गेले दोन दिवस फक्त खुलासाच तयार करण्याचे काम सुरू आहे.

हातकणंगले पंचायत समितीच्या बांधून तयार असलेल्या पण वापराविना तीन वर्षे पडून असलेल्या इमारतीसाठी फर्नीचर करण्याची निविदा काढण्यात आली. एकूण २ कोटी ४७ लाखांचे हे काम आहे. या कामासाठी घातलेल्या अटी, शर्तींवर कंत्राटदार विजय भिके यांनी तक्रार केली. ठराविक कंत्राटदाराची सोय करण्यासाठी अत्यंत चुकीच्या अटी,शर्ती घातल्याचे त्यांनी निदर्शणास आणले. त्यांच्या तक्रारीवर सुनावण्याही घेण्यात आल्या. मात्र तरीही अनेक त्रुटी ठेवून कामाचे आदेश दिल्याचे तक्रार भिके यांनी विभागीय आयुक्‍तांकडे केली आहे. तर आचारसंहिता असताना मागील तारखेत खोटी कागदपत्रे तयार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने जिल्‍हाधिकारयांकडे केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगानेही चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच कारवाईचा मुददा उपस्‍थित होणार आहे.

टेंडर प्रक्रियेपासून सर्व प्रक्रियेचा तपशील जिल्‍हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. कामाचे आदेश देण्यास विलंब झाला हे खरे आहे. मात्र कामाबाबत झालेल्या तक्रारी, त्याची चौकशी, सुनावणी आणि त्याबाबतचा निकाल यामुळे हा विलंब झाला आहे. कोणतीही कागदपत्रे जुन्या तारखेवर झालेली नाहीत.

- महेंद्र क्षीरसागर, कार्यकारी अभियंता बांधकाम