Road Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

सातारा-कागल सहापदरीकरण; पेठ-साताऱ्यासाठी चार कंपन्यांची तयारी

टेंडरनामा ब्युरो

कोल्हापूर (Kolhapur) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सातारा-कागल (Satara-Kagal) सहापदरीला पुन्हा एकदा अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. तसेच रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी टेंडर दाखल करण्याची मुदत ८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सातारा-कागल या महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी सातारा ते पेठ आणि पेठ ते कागल अशा दोन टप्प्यांवर काम होणार आहे. त्यासाठी टेंडर मागविले होते. २५ जानेवारीपर्यंत मुदत होती. या कमासाठी मागविलेल्या टेंडर प्रक्रियेत दुसऱ्या टप्‍यातील कामासाठी एकच टेंडर दाखल झाल्यामुळे त्याची प्रक्रिया पुन्हा करावी लागण्याची शक्यता आहे. तसेच पेठ ते सातारा या टप्प्यावरील कामासाठी चार टेंडर दाखल झाल्या असून ते काम सुरू होण्यास काहीच हरकत राहणार नाही. तांत्रिकबाबींवरील ही टेंडर उघडण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे सहा वर्षे रखडलेल्या कामाला पुन्हा एकदा टेंडर प्रक्रियेतील अडथळे पार करावे लागणार आहेत. टेंडर भरण्यासाठी कंपन्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे यावरून दिसून येते. आत्तापर्यंत दोन वेळा टेंडर दाखल करण्याची मुदत वाढविली आहे.

दरम्यान रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी २५ जानेवारीपर्यंत टेंडर दाखल करण्यासाठी मुदत होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा आठ फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तुर्तात या कामाची सुरवात होण्यास आणखी विलंब होणार असल्याचे दिसून येते.