Ajit Pawar Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Good News : कोल्हापूर आयटी पार्कला गती; 30 हेक्टर जागा देण्याचे अजित पवारांचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरालगतची ५० हेक्टर जागा द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रालयात दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोल्हापूरच्या शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली. पवार म्हणाले की, कोल्हापूरची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग लक्षात घेता येथील विद्यार्थी, युवकांना स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करुन द्यावी. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आयटी पार्कसाठी कृषी विद्यापीठाची मोकळी ३० हेक्टर जागा देताना, विद्यापीठाला पर्यायी ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. शहरातील या क्षेत्रापासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यानंतर कोल्हापूर हा चांगला पर्याय आहे. आयटी पार्कची उभारणी निश्चित कालमर्यादेत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोल्हापूर शहरात असलेले शासकीय आयटी पार्क पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (व्हीसीद्वारे), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा (व्हीसीद्वारे) आदी उपस्थित होते.