Devendra Fadnavis Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Fadnavis : दुष्काळमुक्तीसाठी फडणवीसांचा धडाकेबाज निर्णय! टेंभू योजनेबद्दल काय केली घोषणा?

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : खटाव तालुक्यातील औंधसह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेत उर्वरित पाच गावांचा समावेश करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतला. कलेढोण, मायणी, कुकुडवाडसह ४२ गावांना टेंभूचे पाणी देण्याच्या योजनेच्या कामांची वर्कऑर्डर आठ दिवसांत काढण्याचे आदेशही त्यांनी दिले.

जिहे-कठापूर योजनेत माण तालुक्यातील नव्याने समावेश होऊन सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावांच्या योजनेसाठी सुप्रमा आणि सध्या सुरू असलेल्या या योजनेच्या कामांसाठी निधी घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आले. आमदार जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथिगृहात नुकतीच बैठक आयोजिली होती.

बैठकीला जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कोपले, दूरदृश्य प्रणालीद्वारे ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष लोकेश चंद्र, संचालक संजीव कुमार यांच्यासह जलसंपदा व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. औंध उपसा सिंचन योजनेत औंध, त्रिमली, नांदोशी, खबालवाडी, गणेशवाडी, खरशिंगे, गोपूज, वाकळवाडी, गोसाव्याचीवाडी, कुमठे, वरुड, जायगाव, अंभेरी, लांडेवाडी, कारंडेवाडी, गोपूज या १६ गावांचा समावेश आहे.

याच परिसरातील उर्वरित कोकराळे, लोणी, भोसरे, कुरोली आणि धकटवाडी या पाच गावांचा समावेश या योजनेत करण्याची मागणी जयकुमार गोरे यांनी पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बैठकीत निर्णय घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

माणच्या उत्तर भागातील ३२ गावांसाठीची आंधळी उपसा सिंचन योजना कामे पूर्णत्वाला जाऊन लवकरच कार्यान्वित होत आहे. या योजनेपासून वंचित उत्तर आणि पश्चिम माणमधील गावांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. या गावांसाठीच्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता त्वरित देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

खटाव तालुक्यातील मायणी, कलेढोण आणि माण तालुक्यातील कुकुडवाडसह ४२ गावांना टेंभू योजनेचे पाणी देण्याच्या योजनेच्या कामांचे टेंडर निघाले आहे. या कामांची वर्कऑर्डर आठ दिवसांत काढण्याचे निर्देश मंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माण- खटावच्या दुष्काळमुक्तीसाठी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. लवादाच्या पाणीवाटपावर फेरजल नियोजनाचा निर्णय घेऊन त्यांनी पाच टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिले आहे.

बैठकीत त्यांनी औंध योजनेत पाच गावांचा नव्याने समावेश, टेंभू योजनेच्या कामांची वर्कऑर्डर, सर्वेक्षण झालेल्या माणमधील गावांसाठी सुप्रमा आणि जिहे-कठापूर योजनेच्या कामांना निधी देण्याचे निर्णय घेतल्याने माण- खटावमधील सिंचन योजनांची कामे प्रगतिपथावर जाणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.