Jal Jeevan Mission Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : ‘जलजीवन’च्या कामातील अडचणींबाबत ठेकेदारांची पालकमंत्र्यांकडे धाव

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची अनेक कामे केली आहेत. त्यापैकी अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, ठेकेदारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्या अडचणी सोडवाव्यात, या मागणीसाठी ठेकेदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

शनिवारी (ता. ३) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री पाटील सोलापुरात येणार आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन ठेकेदार जलजीवन मिशनच्या कामातील अडचणींबाबत निवेदन देणार आहेत. निविदा चौकशीच्या नावाखाली १८९ कामांची देयके मार्च २०२३ पासून प्रलंबित आहेत. त्यातील १६ कामांची चौकशी गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगून ती कामे बंद करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. परिणामी आर्थिक अडचणींमुळे कामे बंद आहेत. त्या कामांबाबत स्पष्ट निर्णय घेऊन देयके द्यावीत. विहीर, टाकी, पंप हाऊस यासाठी जागेचा अभाव, पिकातून जलवाहिनी टाकण्यास शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. तर पावसाळ्याच्या तीन महिन्यांत विहिरीचे काम करता येत नाही. त्या कामांना विनादंड मुदतवाढ द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

पाइपच्या किमती वाढल्याने जादा दराच्या टेंडरचे प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी सरकारकडे पाठविले आहेत. त्यांना त्वरित मान्यता द्यावी. जलजीवनची सर्व कामे वाळून करण्याची सक्ती केली आहे. परंतु लिलावाअभावी अवैध मार्गाने वाळू खरेदीमुळे ठेकेदारांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. त्यासाठी वाळू उपलब्ध करून द्यावा. कामे पूर्ण झालेल्या ठेकेदारांची अंतिम देयके १० टक्के रक्कम कपात न करता द्यावीत. कामाच्या देयकातून कपात केलेली सुरक्षा व अनामत रक्कम सरकारकडे प्रलंबित आहे. ती तातडीने द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी सांगितले.