bridge Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर ठेकेदाराची उचापत, पाहा काय?

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : सातारा जिल्ह्याची हद्द खुबी येथे संपते व तेथून जवळ असलेल्या कोळे (ता. वाळवा) येथून सांगली जिल्हा सुरू होतो. खुबी गावात येतानाच कोळे गावाकडे वळणाऱ्या ओढ्यातील पुलाचे काम यंदाच्या उन्हाळ्यात वाळवा बांधकाम विभागाने हाती घेतले. ते काम करणाऱ्या ठेकेदाराने सुरुवातीपासून उचापतींचा अक्षरशः उच्चांक गाठला आहे.

सध्‍या हे काम अर्धवट ठेवले असून, हा पूल असून अडचण आणि नसून खोळंबा असा ठेवल्यामुळे दोन्ही गावांतील लोकांना याचा नाहक त्रास होत आहे. ठेकेदाराची उचापत संबंधित बांधकाम विभाग पाठीशी घालत आहे. परिणामी अर्धवट काम ठेवल्यामुळे वाहतूक खोळंबत आहे व पुलाच्या बाजूच्या भरावाचे पिचिंग न झाल्याने तो ढासळतो की काय? या भीतीच्या छायेखाली दोन्ही गावचे ग्रामस्‍थ आहेत.

खुबी गावात येताना मुख्य रस्त्यात वळण घेऊन सांगली जिल्ह्यातील गावांमध्ये प्रवेश करता येतो. तेथून जवळच्या कोळे गावातील लोकांना येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना व रेठरे बुद्रुक गावात येण्यासाठी खुबीच्या रस्त्याचा वापर होतो. या वळणावर ओढ्यावर वाळवा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची उभारणी केली आहे. हे काम सुरुवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

संबंधित ठेकेदाराने खुबी गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याचा भराव तोडून कामाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीलाच मुख्य रस्ता धोक्यात आणला. तोच पुलाच्या बाजूच्या भरावांचे पिचिंग केलेले नसून, संततधार पावसात ओढ्यात येणाऱ्या तिन्ही बाजूच्या पाण्यामुळे भराव वाहून जाऊ शकतो. याबाबत सकाळने बातमीच्या माध्यमातून वाळवा बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनदेखील संबंधित विभाग ठेकेदाराची पाठराखण करत आहे. यातून फाजील विश्वास उराशी घेत ठेकेदाराने कामच अर्धवट ठेवून तेथून काढता पाय घेतला आहे. पुलावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. चारचाकी वाहनांना ये-जा करता येत नाही. दुचाकींना स्थानिकांनी छोटीशी वाट बनवून त्यावरून ये-जा होते. काम अर्धवट ठेवून ठेकेदाराने पलायन केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात सभोवतीचा भराव ढासळतो की काय? हीच भीती वाटते, हे नक्की.