सातारा (Satara) : सरकारच्या डिजिटल इंडिया मिशन योजनेचे कोरेगाव तालुक्यात तीन तेरा वाजले आहेत. केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून दुरुस्तीअभावी तालुक्यातील तब्बल १४३ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १०० ग्रामपंचायतींची इंटरनेट सेवा बंद आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या (फेज वन) कोरेगाव, माण, खंडाळा, वाई, फलटणमधील पाच तालुक्यांत ५३२ पैकी ४०१ ग्रामपंचायतींची इंटरनेट सेवा ठप्प आहे.
कोरेगावात नेटवर्क बंद असणाऱ्या ग्रामपंचायतींनी शतक गाठले आहे. त्यामुळे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या नवीन कंपनीने टेंडर घेतल्याची माहिती मिळत आहे. ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही यंत्रणा काम करत नसल्याचे चित्र आहे. ऑप्टिकल फायबर अनेक ठिकाणी तुटल्यामुळे बंद ग्रामपंचायतींची संख्या वाढत आहे. जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत ग्रामपंचायतींना इंटरनेटअभावी कामासाठी ताटकळावे लागेल. काही ग्रामपंचायतींनी खासगी इंटरनेट कनेक्शनचा वापर करत आहेत.
अशी आहे स्थिती...
* भारत सरकारचा डिजिटल इंडिया कार्यक्रम २०१५ मध्ये सुरू
* भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
* सर्व ग्रामपंचायत इंटरनेटने जोडण्याचा उपक्रम
* त्या माध्यमातून गावचा कारभार पारदर्शी होणे
* सर्वसामान्य नागरिकांची वेळ, पैशांची बचत होऊन ग्रामपंचायतीत सेवा उपलब्ध
* जिल्ह्यात योजनेचे दोन टप्प्यांत काम पूर्ण
* पहिल्या टप्प्यात कोरेगाव, वाई, खंडाळा, माण व फलटण तालुक्यांचा समावेश
* या तालुक्यांत सर्व ग्रामपंचायत भुयारी ऑप्टिकल फायबर केबलद्वारे जोडल्या
* दुरुस्तीअभावी सध्या सर्वच ग्रामपंचायत ऑप्टिकल फायबरने कनेक्ट सेवा सलाईनवर
* इंटरनेट सेवा व त्या सेवा पुरवणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरची दमछाक
* कोरेगाव तालुक्यात नेटवर्क बंद असणाऱ्या ग्रामपंचायतीचे शतक
* कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले इंटरनेटचे जाळे हे दुरुस्तीअभावी खराब होण्याची चिन्हे
आकडे बोलतात...
तालुका - ग्रामपंचायत संख्या
कोरेगाव - १४३
सेवा बंद ग्रामपंचायती - ९९
खंडाळा - ६६
सेवा बंद ग्रामपंचायती - ४८
वाई - ९९
सेवा बंद ग्रामपंचायती - ८३
माण - ९७
सेवा बंद ग्रामपंचायती - ६४
फलटण - १३२
सेवा बंद ग्रामपंचायती - १०७