कोरेगाव (Koregaon) : सातारा-लातूर (Satara-Latur) राष्ट्रीय महामार्गाचे काम कोरेगाव शहरातून सुरू असताना त्यामध्ये वाहतूक सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याप्रकरणी येथील पोलिसात या रस्त्याचे काम करत असलेल्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फास्ट्रक्चर कंपनीच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण संभाजीराव बर्गे यांनी येथील पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. आठ) रात्री ११ च्या सुमारास बर्गे हे आपला मित्र रतन तलकचंद ओसवाल यांच्यासमवेत दुचाकीवरून एकंबे रस्त्यावरील एका भोजनालयाकडे जेवण करण्यासाठी निघालेले होते. त्यावेळी बंडोपंत कालेकर यांच्या घरासमोर महामार्गाच्या कामासाठी जेसीबी आदी मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने केलेल्या मोठ्या खोदकामाजवळ कोठेही बॅरिकेट, सुरक्षापट्टी, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक आदी वाहतूक सुरक्षिततेसाठी कसल्याही प्रकारे उपाययोजना केलेल्या नव्हत्या.
परिणामी बर्गे आणि त्यांचा मित्र ओसवाल यांची मोटारसायकल (एमएच- ११-३६२४) खड्ड्यात पडून अपघात झाला. त्यात चालक बर्गे यांच्या मांडी, हात, डोके व कपाळावर दुखापत झाली, तर ओसवाल यांच्या नाकाला गंभीर दुखापत होऊन त्यांना २० टाके पडले. तातडीने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. या पार्श्वभूमीवर बर्गे यांनी येथील पोलिसात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फास्ट्रक्चरच्या ठेकेदाराविरुद्ध महामार्गाचे काम प्रत्यक्ष करताना वाहतूक सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न केल्याने आपला अपघात झाल्याची तक्रार केली आहे. अधिक तपास कोरेगाव पोलिस करत आहेत.