Street Lights Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Baramati: बारामतीत दिव्याखाली अंधार! काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

बारामती (Baramati) : शहरातील अनेक पथदिवे बंद अवस्थेत असतात, नागरिकांना याचा थेट फटका बसतो, मात्र दिवे सुरू राहण्याबाबत फार कार्यवाही होत नसल्याची तक्रार आहे.

बारामतीत नगरपालिकेच्या हद्दीत जवळपास अकरा हजारांवर पथदिवे आहेत. यातील अनेक दिवे सातत्याने बंद असतात. नादुरुस्त दिव्यांची दुरुस्ती बराच पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही. जोपर्यंत तक्रारी येत नाहीत तोपर्यंत या दिव्यांची दुरुस्तीच केली जात नाही.

शहरातील पथदिव्यांच्या खांबावर अनुक्रमांक टाकण्यात आले आहेत. ज्या खांबावरील दिवा नादुरुस्त असेल त्या क्रमांकासह तक्रार केल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्याची व्यवस्था बसविल्याचे नगरपालिकेकडून सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र अनेक दिवे बंद अवस्थेत कायमच असतात.

बारामती नगरपालिकेने खासगी संस्थेकडे सात वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचे कंत्राट दिलेले आहे. नगरपालिकेकडून जरी या संस्थेला हे कंत्राट दिलेले असले तरी त्याचे नियोजन व समन्वय होण्याची नागरिकांची अपेक्षा आहे. लाखो रुपये खर्चूनही जर दिव्यांचा उजेडच पडत नसेल तर या बाबत नगरपालिकेने उपाययोजना करण्याची गरज बोलून दाखवली जात आहे.

वर्दळीच्या अनेक रस्त्यांवर काही खांबावरील दिवे सुरू तर काही बंद असतात. काही ठिकाणी पथदिव्यांभोवती झाडांच्या फांद्या असल्याने अशा ठिकाणी फांद्या सावळण्याची गरज असताना त्या कडेही फारसे लक्ष दिले जात नाही. शहरातील किती पथदिवे सुरू आहेत, किती बंद अवस्थेत आहेत, त्याची कारणे काय आहेत, ते केव्हा सुरू होणार याबाबत नागरिकांना माहिती मिळत नाही. अनेकदा केबल जळाल्यानंतर तर दोन तीन आठवडे दिवे बंद राहतात.

दिवे सुरू व बंद करण्याच्या वेळा देखील ऋतूनुसार बदलणे गरजेचे असते. अनेकदा नागरिकांचा आरडाओरडा होत नाही तो पर्यंत प्रशासन याकडे लक्षच देत नाही अशीही नागरिकांची ओरड आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्यांची गैरसोय होते, अनेकदा अंधाराचा फायदा घेत अनेकदा चोऱ्याही झालेल्या आहेत. नगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या चार वायरमन कर्मचाऱ्यांनी शहरात त्यांच्याकडे असलेल्या भागामध्ये रात्री फिरून बंद दिव्यांच्या नोंदी ठेवायला हव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.

एकीकडे पथदिवे बसविणे व दुसरीकडे देखभाल दुरुस्ती असे दुहेरी टेंडर काढलेले असून त्या मुळे बारामतीकरांवर दुहेरी आर्थिक बोजा पडत आहे. यामुळे बारामतीकरांचे आर्थिक नुकसान होत आहे, दुसरीकडे पथदिव्यांबाबतची ओरड कायमच आहे.

- सुनील सस्ते, माजी विरोधी पक्षनेते, बारामती