पुणे (Pune) : जगातील सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी असलेली 'भारत फोर्ज' बारामतीमध्ये ५० एकर जागेवर मेगासाईटची उभारणी करणार आहे. कल्याणी टेक्नोफोर्जच्या या मेगासाईटच्या प्रकल्पात जवळपास दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे व त्यातून १,२०० रोजगार निर्माण होणार आहेत.
या प्रस्तावित प्रकल्पामध्ये ऍल्युमिनियम फोर्जिंग, सुटे भाग, स्टील फोर्जिंग, असेंब्ली व सब-असेंब्ली, इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहनांसाठी गिअर मॅन्युफॅक्चरिंग तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे. या प्रकल्पासाठी ५० एकर जागेच्या मागणीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्यता दिली, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
भारत फोर्जच्या वतीने देशभरात १२ ठिकाणी अत्याधुनिक व सुसज्ज प्रकल्प उभारण्यात आले आहेत. चार दशकांहून अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कल्याणी टेक्नोफोर्जकडून विविध क्षेत्रांतील उत्पादन केले जाते. हा प्रकल्प बारामतीच्या औद्योगिक विकासाला चालना देणारा व मोठी रोजगारनिर्मिती करणारा असणार आहे.