Road work Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

टेंडरनुसार कामे पूर्ण न झाल्याने पालिकेचे ठेकेदारांना 'इंजेक्शन'

टेंडरनामा ब्युरो

अहमदनगर (Ahmednagar) : रस्त्यांची कामे टेंडरप्रमाणे वेळेत व्हावीत, यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांना नोटीसा दिल्या आहेत. हे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात पाइपलाइन रस्ता, शिलाविहार रस्ता, गुलमोहर रस्ता, तारकपूर रस्ता तसेच इतर अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व डांबरीकरणासाठी टेंडर काढण्यात आले. टेंडरमध्ये काम पूर्ण करण्याची मुदतही देण्यात आली, असे असताना काही कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. पावसाळा एक महिन्यावर आल्याने नंतर डांबरीकरणाची कामे करता येणार नाहीत. तसेच केलेली कामेही पावसाळ्यात खराब होतात. त्यासाठी ही कामे वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना मनपाच्या अभियांत्यांनी वारंवार संबंधित ठकेदारांना दिल्या. तथापि, अद्यापही काही कामे अपूर्ण आहेत. शिलाविहार व गुलमोहर रस्त्यांची कामे बरीच अपूर्ण असल्याने अखेर शहर अभियंता सुरेश इथापे यांनी ठेकेदारांना नोटीसा बजावल्या आहेत.

रस्त्याची कामे करताना अनेक अडचणी येतात. नळ कनेक्शन तुटणे, वायर तुटणे, रस्त्यावरील झाडे, अतिक्रमणे अशा अडचणींबाबत मार्ग काढण्यासाठीचे नियोजन केलेले असते. हे सर्व गृहित धरूनच कामाची मुदतवाढ दिलेली असते. तथापि, असे असतानाही काम होत नसल्याने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

या कंपनीला दोन नोटीसा

गुलमोहर रोड (सुरभी हॉस्पिटल ते कुष्ठधाम) या रस्त्यावरील दोन्ही बाजुंनी गटारप्रश्नी बेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनीला मनपाने नोटीस बजावली आहे. रस्त्याच्या साईट गटारांचे काम संथ गतीने काम सुरू आहे. त्यामुळे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मनपामध्ये आंदोलन केले. तरीही हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना अडथळे निर्माण होत आहेत. वारंवार लेखी देऊनही हे काम वेगान होत नाही. उर्वरीत काम ३१ मेअखेर पूर्ण करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे शहर अभियंत्यांनी नोटीसीमध्ये म्हटले आहे. अशीच नोटीस गुलमोहर पोलिस चौकीत ते पाइपलाइन रोड-श्रीराम चौकादरम्यानच्या रस्त्यासाठी याच कंपनीला बजावण्यात आली आहे. अशा पद्धतीने इतरही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

असे आहेत टेंडर

पाइनपाइन रस्ता - ३ कोटी ७० लाख

गुलमोहर रस्ता - ४ कोटी ५३ लाख

शिलाविहार रस्ता - ३ कोटी ५ लाख

तारकपूर रस्ता - १ कोटी ८० लाख

टेंडरप्रमाणे कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही, तर अडचणी निर्माण होतात. अपूर्ण कामांमुळे नागरिकांचेही हाल होतात. असे असतानाही काही ठेकेदार कंपन्यांकडून ही कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कामे वेळेत पूर्ण केली नाही, तर प्रसंगी कारवाई करण्यात येणार आहे.

- सुरेश इथापे, शहर अभियंता, मनपा.