garbage Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar : महापालिकेने कचरा उचलण्यासंदर्भात लढविली अनोखी शक्कल

टेंडरनामा ब्युरो

अहिल्यानगर (Ahilyanagar) : घंटागाडी घरोघरी वेळेत आणि नियमित जाते की नाही, हे तपासण्यासाठी आता प्रत्येक घराला क्यूआर कोड बसविण्यात येणार आहे. कचरा उचलल्यानंतर कर्मचाऱ्यांना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. त्यातून कोणत्या भागातला कचरा किती वाजता उचलला, याची ऑनलाइऩ माहिती महापालिकेला त्वरीत मिळणार आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

शहरात दररोज सुमारे दीडशे टन कचरा जमा होतो. हा कचरा उचलण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. सुरूवातीला नागरिकांना कचराकुंडीत कचरा टाकावा लागत होता; परंतु आता कचरा उचलण्यासाठी घरोघरी घंटागाडी येते. त्यामुळे कचरा टाकण्याचा प्रश्‍न सुटला आहे. दरम्यान, शहरात अनेक भागात घंटागाडी पोहचत नाही. नियमित आणि वेळेत घंटागाडी येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून आता नागरिकांच्या घराला क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. कचरा उचलण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन न केल्यास संंबंधित भागातील कचरा उचलल्याची नोंद होणार नाही, त्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर राहणार आहे. त्यामुळे आता घरावर बसविण्यात येणाऱ्या क्यूआर कोडने नागरिकांचा कचरा टाकण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. घंटागाडी आली नाही, कचरा उचलला नाही, अशा तक्रारी करण्याची गरज नागरिकांवर येणार नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

खासगी संस्थेमार्फत काम सुरू

घरावर क्यूआर कोड बसविण्याचे काम खासगी ठेकेदार संस्थेला देण्यात येणार आहे. या कामास सुरूवातही झाली आहे. प्रारंभी संपूर्ण एका प्रभागातील घरांना हे क्यूआर कोड बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर ही सेवा सुरू होणार आहे. शहरात सुमारे एक लाख ३१ हजार मालमत्तांची नोंद आहे. या सर्व मालमत्तांवर हे क्यूआर कोड बसविण्यात येणार आहेत.

दररोजचा कचरा - १५० टन

एकुण मालमत्ता - १ लाख ३१ हजार

घंटागाड्यांची संख्या - ६५

एकुण प्रभाग - १७

शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे. कचरा नियमित उचलला जावा, कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यासाठी आता घरोघरी क्यूआर कोड बसविण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून घंटागाडीवर नियंत्रण ठेवता येईल, कचरा उचलला की नाही, याची माहिती तत्काळ कळणार आहे.

- यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका