Adani Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Adani Green : अखेर कोल्हापूरकर जिंकले; अदानींचा 'तो' प्रकल्प का झाला रद्द?

टेंडरनामा ब्युरो

कोल्हापूर (Kolhapur) : पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी (Adani) ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमार्फत जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार होता. याबद्दल भुदरगडवासीयांत प्रचंड अस्वस्थता होती. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ, सर्वपक्षीयांनी आंदोलन केले.

हा प्रकल्प रद्द करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मी लेखी निवेदन दिले होते. अखेर जनतेच्या लढ्याला यश आले. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने हा प्रकल्प रद्द केला आहे’, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

आबिटकर म्हणाले, ‘‘भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्यम प्रकल्प जीवनदायी आहे. इथला प्रत्येक थेंब नागरिक व शेतीसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्रकल्पावर तालुक्यातील ११५ हून अधिक गावे व वाड्यावस्त्या अवलंबून आहेत. तालुक्यातील सुमारे १२ हजार ७० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

प्रस्तावित पाटगाव प्रकल्पाकरिता अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमार्फत अंजिवडे (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) गावाजवळ नवीन धरण बांधण्यात येणार असून धरणामध्ये तळंबा खोऱ्यातील साठविलेले पाणी उचलून पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये साठविण्यात येणार असून त्याचा वापर करून २१०० मेगावॉट वीजनिर्मिती होणार असल्याचे समजते.

या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यात गंभीर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण झाल्याने मोठ्या प्रमाणात अस्वस्थता होती. या कारणाने हा प्रकल्प रद्द व्हावा, याकरिता तालुक्यातील नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली होती.’’

हा प्रकल्प रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या पाठपुराव्यास यश आले असून, अदानी ग्रुपमार्फत २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना पत्र लिहून हा प्रकल्प रद्द केल्याचे कळविण्यात आले आहे.

- प्रकाश आबिटकर, आमदार