BEST Bus Tendernama
मुंबई

30 कोटींची थकबाकीदार 'साईन पोस्ट'वर 'BEST'ची मेहरबानी कशासाठी?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बेस्ट उपक्रमाने (BEST) बेस्ट बसमधील जाहिरात हक्कांसाठी निवड केलेल्या कंत्राटदाराने कोणतीही थकीत बिले ठेवू नये, अशी प्रमुख अट असते. मात्र, 'साईन पोस्ट' (Sign Post) या जाहिरात कंत्राटदारावर बेस्ट प्रशासनाने भलतीच मर्जी बहाल केली आहे. कंपनीने मासिक भाड्यातील तब्बल ३० कोटी रुपयांची रक्कम थकीत ठेवली असतानाही याच कंत्राटदाराला ११६ कोटींचे कंत्राट दिल्याचा आरोप मुंबई महापालिकेचे (BMC) माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा 'उपक्रम' बेस्टला आणखी गाळात नेणारा आहे, अशी टीका होत आहे.

बेस्ट उपक्रमाने तीन वर्षांचे जाहिरात हक्क देण्यासाठी टेंडर मागवले होते. बेस्ट बसच्या आतील आणि बाहेरील जाहिरातीचे हक्क विक्रीसाठी हे ११६ कोटींचे हे टेंडर काढण्यात आले आहे. टेंडर प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंत्राटदाराची बिले प्रलंबित किंवा थकीत नसावीत अशी प्रमुख अट असते. परंतु 'साईन पोस्ट' ही कंपनी गेल्या तीन वर्षांपासून बेस्ट संदर्भातील जाहिरात हक्कांचे कंत्राट चालवत होती. तेव्हा या कंपनीने ३० कोटी एवढी मासिक भाड्याची रक्कम थकीत ठेवली असताना पुन्हा त्याच कंपनीला कंत्राट दिल्याचा मुद्दा रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

बेस्टने कंत्राटदाराच्या बॅंक गॅरंटी म्हणून जमा केलेल्या रक्कमेतून थकीत रक्कम वसूल करणे आवश्यक असल्याचेही राजा यांनी म्हटले आहे. बेस्ट प्रशासनाने टेंडर अटींची पूर्तता न करता कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांसह मुंबई महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. बेस्ट उपक्रम आर्थिक संकटाचा सामना करत असूनही संबंधित कंपनीसाठी पक्षपात केला जात असल्याचे रवी राजा यांचे म्हणणे आहे. तसेच ही प्रक्रिया रोखण्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागणार असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.