Road Tendernama
मुंबई

Tender : उरण पनवेल मार्गावरील 'त्या' टप्प्याच्या रुंदीकरणबाबत काय झाला निर्णय?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच उरण पनवेल मार्गावरील सोळाशे मीटर टप्प्याचे रुंदीकरण होणार आहे.

बोकडवीरा पोलिस चौकी ते कोट नाकादरम्यानचा सात मीटर रुंद असलेला हा रस्ता दुप्पट म्हणजे १४ मीटर रुंद होणार आहे, तसेच या मार्गाला दु‌भाजकही बसविण्यात येणार आहेत. उरण पनवेल मार्गावरील वाढत्या वाहनांमुळे अपघातही वाढले आहेत. या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.

पावसाळ्यात झाडा-झुडपांमुळे हा मार्ग अधिकच अरुंद होतो. त्यामुळे वाहन चालवणे जिकिरीचे होते. त्यात या झाडाझुडपांत काटेरी झाडे असल्याने वाहनचालकांना जखमा होतात. याच मार्गावर मागील काही दिवसांत हीट अॅण्ड रनच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये पती-पत्नीचा मृत्यू झाला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासह दुभाजक बसविण्याच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. निवडणुका संपताच टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरूवात होणार आहे.


कोट नाका ते बोकडवीरा या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सध्या हा रस्ता सात मीटर रुंदीचा असून तो १४ मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. विधानसभेच्या निवडणुका संपताच या कामाला सुरुवात होईल.
- नरेश पवार, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण