Western Railway Tendernama
मुंबई

पश्चिम रेल्वेचं पुढचं पाऊल! 'या' कामात 6 महिन्यांत 150 कोटीची कमाई

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या सहा महिन्यांत भंगार विक्रीतून १५० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. भारतीय रेल्वेमध्ये चालू वर्षांत सहा महिन्यांच्या कालावधीतील १५० कोटी रुपये महसूल गोळा करणारा पश्चिम रेल्वे पहिला झोन ठरला आहे.

पश्चिम रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने शून्य भंगार मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व विभागांतून चालू वर्षात एप्रिल ते जुलै २०२२ दरम्यान, भंगाराच्या विक्रीतून १५१.७५ कोटी रुपयांच्या महसुलाची कामगिरी नोंदवली आहे. मागील वर्षी याच कालावधीतील ही आकडेवारी ८८.९१ कोटी रुपये इतकी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी यंदा ८८ टक्यांने अधिक आहे. या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून १५० कोटी रुपयांचा मोठा टप्पा ओलांडणारा पहिला झोन बनण्याचा मान भारतीय रेल्वेत पश्चिम रेल्वेला मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळत नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. झिरो स्क्रॅप मिशनचा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेच्या सर्व विभाग आणि विविध डेपोंवर भंगारविक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेने ५१३.४६ कोटी रुपयांचे भंगार विक्री केले आहे.