BMC Tendernama
मुंबई

Mumbai : 'व्हीजेटीआय', 'आयआयटी'च्या आयडियाची कमाल; महापालिकेची तब्बल 100 कोटींची बचत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अंधेरीतील गोखले ब्रीज आणि बर्फीवाला पुलामध्ये अंतराच्या तफावतीमुळे दोन्ही पूल जोडण्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी बर्फीवाला ब्रीज पाडण्याची गरज नसल्याचा अहवाल व्हीजेटीआयनंतर आता आयआयटी, मुंबईनेही दिला आहे. त्यामुळे बर्फीवाला पूल तोडून नव्याने बांधण्यासाठी येणाऱ्या तब्बल 100 कोटींच्या खर्चाची बचत होणार आहे.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण 26 फेब्रुवारीला झाले. बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची 2.8 मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला होता. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे महानगरपालिकेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या समस्येवर उपाय सूचवण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयकडे परीक्षण करून अहवाल मागवण्यात आला होता.

अंधेरी पूर्व-पश्चिमेकडील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बर्फीवाला पूल तोडून नव्याने बांधण्याचा पर्याय आहे. मात्र यासाठी तब्बल 100 कोटींचा खर्च येऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने व्हीजेटीआयकडे सल्ला मागितला होता. यानुसार 'व्हीजेटीआय'नंतर आता आयआयटीनेही अहवाल सादर केला. पुलाच्या चार स्पॅनपैकी फक्त दोन पूल उंच करावे लागणार आहेत. जॅक आणि विशेष अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून पुलाचे स्लॅब उंचावले जाऊ शकतात, अशा उपायांबाबतही 'व्हीजेटीआय'च्या सूचना आयआयटीने मान्य केल्या असून काही सुधारणाही सूचवल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. यानुसार आता वेगाने काम करून लवकरात लवकर उत्तर बाजूची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल.