Mumbai Tendernama
मुंबई

सायन-शिवडी जलवाहिन्यांचे वृद्धीकरण; टेंडर 'विरल असोसिएट्सला'?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महापालिकेने सायन ते शिवडी दरम्यान असणारा चार रोड परिसर तसेच वडाळ्यातील बॉम्बे पोर्ट ट्रस्ट परिसर पूरमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी या परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांचे वृद्धीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने सुमारे ४६ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले होते. हे काम करण्यास इच्छूक ६ कंपन्यांनी टेंडर सादर केले. यापैकी मेसर्स विरल असोसिएट्स कंपनीचे टेंडर सर्वात कमी दराचे असल्याने हे काम या कंपनीला मिळण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, महापालिकेकडून या कामावर वॉच ठेवला जाणार असून काम सुरू करण्यापूर्वी, काम चालू असतांना व काम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या जागेचे फोटो काढण्यात येतील व ते महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहेत. मुंबई शहर विभागातील परिमंडळ-२ मधील एफ/उत्तर विभागातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकार क्षेत्रातील वडाळा रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस व एल.एम. नाडकर्णी मार्ग येथे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिन्या अतिवृष्टीच्या वेळी पावसाचा प्रवाह वाहून नेण्यास अपूऱ्या आहेत. त्यामुळे वडाळा रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस आर. ए. किडवाई रोड आणि वडाळा स्थानक या परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टीच्या वेळी पाणी साचते. या परिसरात पाणी साचू नये म्हणून वडाळा स्थानकाच्या पूर्व बाजूकडील पर्जन्य जलवाहिन्यांचे वृध्दीकरण करणे आवश्यक आहे. या कामामुळे वडाळा रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस आर. ए. किडवाई रोड आणि वडाळा स्टेशन या परिसरात पावसाळ्यात उद्भवणारी पूरसदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.

या कामासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून पर्जन्य जलवाहिन्या खात्यामार्फत टेंडर प्रक्रिया तयार करण्यात आली. ४१ कोटींच्या या कामासाठी ई-टेंडर मागविण्यात आली आहेत. त्यास ६ ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. यात मेसर्स विरल असोसिएटस्, मेसर्स ऍक्यूट डिझाईन, मेसर्स मेनदीप एंटरप्रायजेस, मेसर्स पी.बी. कंन्स्ट्रक्शन कंपनी, मेसर्स हायटेक इंजिनियर्स आणि मेसर्स योगेश कंन्स्ट्रक्शन या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी मेसर्स विरल असोसिएटस् यांनी सर्वात कमी दराचे टेंडर सादर केल्याने त्यांना हे काम देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. या कामामध्ये पर्जन्य जल वाहिनी प्रणालीतील ढापा ड्रेनचे रूपांतरण, विद्यमान पाईप ड्रेन्सचे विस्तारीकरण / आकारमान वाढविणे, नवीन आर. सी. सी. पाईप ड्रेन्स पुरविणे व टाकणे आणि जलभरावाच्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थितीचा जोर कमी करण्याकरीता इतर जलवाहिन्यांची कामे करणे यांचा समावेश आहे. या कामासाठी महापालिका सुमारे ४६ कोटी रुपये खर्च करणार असून प्रशासकीय मंजुरीसाठी सध्या हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.