Vijay Wadettiwar Tendernama
मुंबई

Vijay Wadettiwar : 'लाडक्या कंत्राटदारा'च्या तुफान यशानंतर आता 'लाडका बिल्डर' योजना आणणार का?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकसकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केला.

वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘सरकारची तिजोरी खासगी बिल्डरसाठी महायुती सरकारने खुली ठेवली आहे. चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या दिल्ली येथील कंपनीवर ही मेहेरनजर दाखवून त्यांना ४०० कोटी रुपये बिनव्याजी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. २०२१ मध्ये या विकसकाशी म्हाडाने करार केला. मात्र आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थीना दिलेला नाही, असे असताना त्याला ४०० कोटींची खिरापत का दिली जातेय. गृहनिर्माण विभागाने असा निधी देण्यास विरोध दर्शविला असतानाही हा निधी देण्यासाठी कोणी दबाव आणला आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

‘बार्टी’च्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नसताना खासगी बिल्डरवर खैरात करणे योग्य नसल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले. कमिशन, टक्केवारी मिळणारी कामे हे सरकार तातडीने करते, असा आरोप करून या सर्व विद्यार्थ्यांना सरकारने शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली.

विदर्भात प्रचंड पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर येथील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर परिसरात देखील अशीच परिस्थिती आहे. सुरक्षित स्थळी लोकांना हलवून त्यांच्या निवारा, जेवण, आरोग्याची व्यवस्था करावी. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यानी केली.

सोनी यांच्या राजीनाम्याची चौकशी व्हावी

प्रशिक्षक सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे देशातील अधिकारी घडवणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग या संस्थेवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. खेडकर यांची नियुक्ती रद्द होण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी सेवेची पाच वर्षे शिल्लक असताना अचानक राजीनामा का दिला, याचे उत्तर सरकारने द्यावे. त्यासाठी या खेडकर यांच्या प्रकरणाशी मनोज सोनी यांचा संबध आहे का, यांची चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.