Veermata Jijabai Bhosale Udyan And Zoo Tendernama
मुंबई

मुंबईकरांच्या भेटीला लवकरच येणार 'अंडर वॉटर व्हिविंग पार्क'

टेंडरनामा ब्युरो

(Mumbai) : मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात (राणीबाग) ‘अंडर वॉटर व्हिविंग पार्क’ उभारले जाणार आहे. काचेच्या भल्यामोठ्या पिंजऱ्यातून मगरींना अगदी जवळून पाहता येणार आहे. आशिया खंडातील हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प ठरणार असून, पुढील तीन महिन्यांत हा प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न उद्यान विभागाकडून सुरू आहेत. त्यासाठी या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे.

राणीबाग नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात राणी बागेत मगर आणि सुसर यांचे उलगडणारे भावविश्व हे खास आकर्षण असणार आहे. यासाठी राणीबागेत चार हजार चौरस मीटर जागेवर ‘क्रोकोडाईल वर्ल्ड’ उभारण्यात येत आहे. सध्या याचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

‘व्ह्यूविंग डेक’ची व्यवस्था

‘क्रोकोडाईल वर्ल्ड’मध्ये ‘व्ह्यूविंग डेक’ची व्यवस्थाही असणार आहे. यामध्ये पर्यटकांना उंचावरील डेकवर जाता येणार आहे. त्यासाठी खास शिड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. डेकवरून पर्यटकांना संपूर्ण ‘क्रोकोडाईल वर्ल्ड’ पाहता येणार आहे. त्यामुळे मगरींचा पाण्यातील तसेच जमिनीवरील वावर अनुभवता येईल.

मगरी आणि सुसरींच्या प्रजननासासाठी पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची संख्यादेखील वाढणार आहे. पेंग्विन, वाघ यांच्याप्रमाणे मगरींना पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढणार असून त्यातून महसुलातदेखील वाढ होणार आहे.

- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक