मुंबई (Mumbai) : उल्हासनगर शहरात गेल्या पावणेदोन वर्षांपासून बंद असलेली परिवहन सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून २० इलेक्ट्रिक बसेससाठी टेंडर मागविण्यात आली आहेत. यापैकी मोठ्या आकाराच्या १० बसेस अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, टिटवाळापर्यंत धावणार असून अन्य १० लहान बसेस शहरातील अंतर्गत भागात धावणार आहेत.
उल्हासनगर शहरात केसट्रल कंपनी मार्फत परिवहन सेवा सुरू होती, बससेवेसाठी आकारण्यात येणाऱ्या तिकिटांसाठी दरवाढ मिळावी अशी मागणी कंपनी मालक राजा गेमनानी यांनी वारंवार केली होती मात्र प्रशासन आणि नगरसेवकांनी ती मागणी अमान्य केली, हा वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर कंपनीने बससेवा बंद केली. त्यानंतर महापालिकेने दोन वेळा परिवहन सेवेसाठी टेंडर काढली मात्र त्यास कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने परिवहन सेवा सुरू होऊ शकली नाही, परिवहन सेवा बंद असल्याने रिक्षाचालक अवाच्या सवा भाडे आकारणी करीत आहेत. त्यामुळे नागरिक सातत्याने परिवहन सेवा सुरू करा अशी मागणी करीत आहेत.
तब्बल पावणेदोन वर्षानंतर इलेक्ट्रिक बससेवा सुरू होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. २० इलेक्ट्रिक बसेस मनपाच्या ताफ्यात येणार असून त्यात मोठ्या आकाराच्या १० बसेस अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, टिटवाळापर्यंत धावणार असून अन्य १० लहान बसेस शहरातील अंतर्गत भागात धावणार आहेत. बसडेपो, चार्जिंग स्टेशन आदींसाठी कंत्राटदाराला जागा मनपा प्रशासन देणार असून त्यात कंत्राटदारामार्फत सर्व्हिसिंग व इतर कामे करण्यात येणार आहेत. शहरातील विविध ठिकाणी बस थांबे बांधण्यात येणार आहेत. तत्पूर्वी आम्ही २० इलेक्ट्रिक बसेससाठी टेंडर मागविली आहेत अशी माहिती महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. परिवहन सेवेचे तिकीट दर हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असतील असेच आमचे प्रयत्न राहतील अशी माहिती नाईकवाडे यांनी दिली.