मुंबई (Mumbai) : पुणे महानगरपालिकेमध्ये (PMC) नव्याने समाविष्ट ११ गावांमधील मलवाहिन्या विकसित करण्याच्या कामांच्या टेंडरचे (Tender) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (COEP) तज्ज्ञांमार्फत त्रयस्थ पद्धतीने लेखापरीक्षण केले जाईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सदस्य भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री सामंत यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, पुणे मनपाच्या ११ समाविष्ट गावांमधील विविध कामांच्या संदर्भात तज्ज्ञ सल्लागार यांची नियुक्ती करून जागेवरील सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. जागेवरील भौगोलिक परिस्थिती व २०४७ पर्यंतची भविष्यात होणारी लोकसंख्येतील वाढ गृहीत धरून हायड्रोलिक डिझाईन करून मुख्य मलवाहिन्या व मैलापाणी गोळा करावयाच्या वाहिन्यांचा व्यास ठरविण्यात आलेला आहे. या ११ गावांमध्ये प्रत्यक्ष मलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून, ते प्रगतीपथावर आहे. २०४७ पर्यंतच्या लोकसंख्या गृहीत धरून नियोजन करण्यात आलेले आहे. हे काम टेंडरमध्ये दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधींच्या काही तक्रारी असतील तर त्या अनुषंगाने नगरविकास सचिवांना पुण्यात बैठक घेण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. सदस्य ॲड. राहुल कुल, दिलीप लांडे यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.