Uday Samant Tendernama
मुंबई

Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली गुड न्यूज; 'हे' रस्ते होणार चकाचक

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्ते काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. या कामावर सुमारे २०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) औद्योगिक वसाहतींमधील रस्ते व दळणवळणासारख्या इतर पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तळोजातील उद्योजकांना येथील खड्डयांचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढला जाईल, असे आश्वासन दिले होते.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्ता काँक्रिटचा आहे. याच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या बांधकामामुळे तळोजातील दळणवळणाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. मात्र औद्योगिक वसाहतीमधील इतर रस्ते डांबरीकरणाचे असल्याने वर्षानुवर्षे या डांबरी रस्त्यावर खड्डे पडणे त्यावर डांबराचा मुलामा लावून हे रस्ते दुरुस्ती करण्याचे काम चालते.

तळोजा उद्योजकांचे संघटनेने (टीआयए) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे रस्त्यांची सोय चांगली असावी अशी मागणी तळोजा येथे झालेल्या बैठकीत केली होती. या बैठकीमध्ये एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सर्व रस्ते काँक्रीटचे करा असा आदेश उद्योगमंत्र्यांनी दिला होता.

यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानंतर आता हे रस्ते काँक्रिटचे बांधण्याचा निर्णय झाला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे टीआयएचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एमआयडीसीच्या या निर्णयामुळे उद्योजकांना तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सर्व अंतर्गत रस्ते काँक्रिटचे मिळणार आहेत.