Mumbai मुंबई : रायगड जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ वर्षासाठी ५०१ कोटी ६१ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा आराखडा मंजूर करण्यात आला.
नियोजन विभागाने रायगड जिल्ह्याला दिलेल्या वित्तीय मर्यादेनुसार जिल्हा नियोजन समितीने या आराखड्यास मान्यता दिली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ४३२ कोटी, अनुसुचित जाती उपयोजनेच्या २८ कोटी तसेच आदिवासी उपयोजनेच्या ४१.६१ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. २०२४-२५ साठी या तिन्ही योजनांचा मिळून ५०१.६१ कोटीच्या आराखड्यास समितीने मान्यता दिली.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ सर्वसाधारणसाठी अर्थसंकल्पीय तरतूद ३६० कोटी मंजूर करण्यात आली होती व ३६० कोटी इतका निधी प्राप्त झाला होता. या निधीपैकी जून २०२४ अखेर २०२.९७ कोटी प्रत्यक्ष खर्च झाला असून त्याची टक्केवारी ५६.४ टक्के इतकी आहे.
२०२३-२४ मध्ये नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ५५.४६ लाख रुपयांची तीन कामे मंजूर करण्यात आली असून ५५.४६ लाख निधी वितरीत करण्यात आला होता. जून २०२४ अखेर ५५.४६ लाख प्रत्यक्ष खर्च झाला असून त्याची टक्केवारी १०० टक्के इतकी आहे.
२०२३-२४ मध्ये यंत्रणांच्या मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ५२.२९ कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत ०.६४ कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत ६.९७ कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले.
रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीत विभागीय आयुक्त विभागाचे तसेच निर्णय क्षमता असणारे अधिकारी उपस्थित राहत नसल्याची नाराजी खासदार सुनील तटकरे यांनी बैठकीत बोलून दाखवली आहे. त्यानंतर, जे अधिकारी बैठकीला गैरहजर राहिले त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आ. रविंद्र पाटील, आ. भरत गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. गेल्यावर्षी ३६० कोटींचा असणारा आराखडा सन २०२४-२५ साठी ४३२ कोटींचा केला आहे. विकासात्मक कामाला शासनाने अतिरिक्त ७२ कोटी निधी वाढवून दिला आहे.
- उदय सामंत, पालकमंत्री, रायगड