मुंबई (Mumbai) : नरीमन पॉईट (Nariman Point) ते वरळी (Worli) पर्यंतच्या सागरी किनारी मार्गाच्या बोगद्याचा पहिला टप्पा सोमवारी पूर्ण झाला आहे. मावळा या टनल बोरींग मशिनने बरोबर वर्षाच्या कालावधीत 2 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदून पूर्ण केला आहे. प्रियदर्शनी पार्क पासून मलबार हिल टेकडी, गिरगाव चौपाटी खालून हा बोगदा खोदण्यात आला आहे. जमिनीच्या 10 ते 70 मीटर खालून हा बोगदा जात आहे. हा संपूर्ण मार्ग 10.58 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 12 हजार 721 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले आहे.
11 जानेवारी 2021 मध्ये प्रियदर्शनी पार्क पासून या खोदकामाला सुरवात करण्यात आली. या बोगद्याचा 12.20 मीटर व्यास आहे. तीन लेनचा हा प्रत्येक बोगदा आहे. तसेच, हवा खेळती रहावी म्हणून सकार्डो यंत्रणा वापण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर या 4 मजली उंचीच्या टनल बोरींग मशिनचे सर्व भाग सुटे करण्यात येणार आहेत. त्यानंतर हे भाग हलवून दुसऱ्या बाजूच्या प्रस्तावित बोगद्याच्या ठिकाणी आणण्यात येतील. तेथे पुन्हा हे भाग जुळवून खोदकामाला सुरवात करण्यात येईल असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून बोगद्याच्या ब्रेक थ्रूची पाहणी केली. तर, यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, प्रमुख अभिनंता विजय निघोट उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप
कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा प्रकल्प असल्याचे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. काम सुरु झाले तेव्हा आव्हानात्मक वाटत होते. मात्र महापालिका आणि कोस्टल रोडमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, कामगार, अधिकार्यांनी अहोरात्र काम करून स्वप्न सत्यात उतरवून दाखवले. कोरोनाच्या दोन लाटा, लॉकडाऊन, ऊन, पाऊस वारा, वादळे अशी संकटे असताना कामात कुठेही खंड पडू न देता उद्दिष्ट्य गाठल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे कौतुक केले. कोस्टल रोडमुळे वाहतुकीच्या सुविधेसह प्रेक्षणीय स्थळेही निर्माण होणार आहेत. सुशोभीकरण होणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून आवश्यक असणारे सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.