मुंबई (Mumbai) : वडोदरा ते मुंबई या महामार्गाच्या बांधकामाचा शेवटच्या पॅकेजचे ९.९८ किलोमीटर लांबीचे काम सध्या वेगाने सूरु आहे. या महामार्गावरील ४.१६ किलोमीटर लांबीच्या दोन दुहेरी बोगद्यापैकी एक बोगदा खणण्याचे काम २४ ऐवजी अवघ्या १५ महिन्यांत पूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ही माहिती समाज माध्यमाद्वारे दिली. देशातील रस्ते बांधकामातील हा सर्वात लांबीचा (४.१६ किलोमीटर) बोगदा आहे.
बदलापूर येथील भोज गाव ते पनवेल येथील मोरबे गाव या शेवटच्या पॅकेजचे १४०० कोटी रुपयांचे काम इरकॉन इंटरनॅशनल आणि जे. कुमार इन्फ्रा. प्रोजेक्ट या ठेकेदार कंपन्या करीत आहेत. वडोदरा मुंबई राष्ट्रीय महामार्गामुळे १५ मिनिटांत पनवेल ते बदलापूर जाता येणार आहे. तसेच जेएनपीटी बंदरातील कंटेनर वाहतूक यापुढे बदलापूर मार्गे समृद्धी महामार्ग आणि दिल्ली वडोदरा महामार्गाने करता येणार असल्याने पनवेल, तळोजा, कल्याण येथील वाहतुकीचा मोठा ताण कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडोदरा मुंबई महामार्गाचे आरेखन केले आहे.
शेवटच्या पॅकेजच्या बोगद्यासह महामार्ग बांधण्याचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. दुहेरी बोगद्यापैकी एका बोगद्याचे काम खणून पूर्ण झाले असून उर्वरित दुसऱ्या बोगद्याचे कामही ८० टक्के पूर्ण झाले आहे. या दोन्ही बोगद्यांची मध्यभागाची उंची १३ मीटर आणि रुंदी २२ मीटर आहेत. ग्रीन फील्ड बोगद्यात वाहने मध्ये प्रवेश करु शकणार नाहीत, अशा पद्धतीने बोगद्यांची रचना करण्यात आली आहे. हे बोगदे खणण्यासाठी माथेरानच्या डोंगररांगामध्ये डोगराला दिवसाला चार वेळा सुरूंग स्फोट घडवून आणले जात होते. स्फोटानंतर डोंगराला भेदून त्यातील ३ ते ४ मीटर लांबीतून निघणारा राडारोडा काढून त्यानंतर बोगद्याच्या पुढील कामाची सुरुवात केली जात होती. स्वित्झर्लंड बनावटीच्या यंत्रसाहित्याची जोडणी करुन ‘बूमर ड्रील जम्बो’ यंत्राच्या साह्याने दोन्ही बोगदे खणण्याचे काम केले आहे. यंत्रासोबत चालक, ऑपरेटर, मजूर, मशीन सहाय्यक असे ३०० मजूर याच ठिकाणी दिवसरात्र दोन पाळ्यांमध्ये काम करतात. अभियंत्यांनी याच परिसरात वास्तव्य करण्याची तयारी दर्शविल्याने मोठे यश गाठता आले. अजून दुसऱ्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे.
आठ मार्गिका असलेला सर्वाधिक लांबीचा हा बोगदा असून ठरविलेल्या मुदतीत बोगदा खणण्यासोबत हा बोगदा खणताना सर्व सुरक्षा नियम पाळल्यामुळे एकही दुर्घटना घडली नाही. या बोगद्यानंतर महामार्ग रस्ते बांधणीचे महत्वाचे काम मार्गी लागले असून थेट पनवेल ते बदलापूर काही मिनिटांवर जोडले जाणार आहे. दोन्ही बोगदे एकमेकांना लागूनच आहेत, त्यामुळे एका बोगद्यात काही अडथळा झाल्यास वाहतूक दुसऱ्या बोगद्यात वळविता येईल अशी रचना करण्यात आली आहे. बोगदा खणण्यापूर्वी बोगद्याचे दोन्ही बाजूकडील बिंदू जुळण्यासाठी सर्वे पथकाने जुळवून आणलेल्या कॉर्डिनेट्समुळे अचूक बोगद्याचा मध्य गाठता आला.
– पी. डी. चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण