Mumbai Pune Expressway Tendernama
मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भरमसाठ टोल भरूनही 'हा' जाच कशासाठी?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबई-पुणे असा नियमित प्रवास करणे ही शिक्षा वाटावी, अशी परिस्थिती आहे. द्रुतगती मार्गावरून भरमसाठ टोल भरून प्रवास करायचा म्हटले तरी किती वेळ लागेल याचा भरोसा उरलेला नाही. कारण टोलवरील लांबच लांब रांगा, घाटामध्ये संथ होणारी वाहतूक यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. परत अपघात झाल्यावर तर प्रवाशांचे हाल विचारूच नका! टोल देऊनही मनस्ताप आणि रेंगाळणारा प्रवास कशासाठी करायचा, अशी विचारणा अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. (Mumbai - Pune Expressway News)

संकेत हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून कामानिमित्त पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून नियमित प्रवास करतात. त्यांच्यासारखीच व्यथा या रस्त्याचा वापर करणाऱ्या हजारो प्रवाशांची आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग उभारणीनंतर पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास सुपरफास्ट झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करणे ही वाहनधारकांना शिक्षा वाटत आहे. नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, अपघातात होणारे मृत्यू, आदी कारणे याला कारणीभूत आहेत. पूर्वी अडीच-तीन तासांत होणार हा प्रवास आता पाच ते सहा तास लागले तरी संपत नाही. घाटात अपघात झाला तर मग तर कोंडीतच चार -पाच तास जातात. कोंडी सोडण्यासाठी ‘मलमपट्टी’ केली जाते, मात्र ठोस उपायांची वाणवाच आहे. त्यामुळे 'एक्स्प्रेस वे' वरील वाहतूक कोंडी फुटणार कधी?, हा प्रश्न पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना भेडसावत आहे.

कुठे होते वाहतूक कोंडी...
पुण्याहून मुंबईला निघाल्यावर पहिल्यांदा कोंडी होणारे ठिकाण म्हणजे उर्से टोल नाका. त्यानंतर लोणावळा व खंडाळा घाट, आडोशीचा बोगदा, मग खालापूर टोल नाका. या ठिकाणी कोंडी झाली तर पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. मुंबईहून पुण्याला येताना खालापूर टोल नाका, लोणावळ्याहून बाहेर पडताना ‘बॉटल नेक’ तयार होतो ते ठिकाण, अमृतांजन पूल आदी ठिकाणी नियमित वाहतुकीची कोंडी होते.

कोणत्या वेळी होते कोंडी...
- पुण्याहून निघाल्यावर उर्सेजवळ सकाळी सात ते नऊ, खालापूरजवळ सकाळी १० ते ११ यावेळेत कोंडी होते.
- मुंबईहून निघाल्यावर दुपारी ५ ते रात्री १० या वेळेत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज धावणारी वाहने (पोलिसांचा अंदाज)...
दररोज दुतर्फा धावणारी वाहने : ६० हजार
शनिवार-रविवार धावणारी वाहने : ८० ते ९० हजार

पुणे-मुंबई द्रुतगती (टोल प्रशासन)
दररोज दुतर्फा धावणारी वाहने : ३० ते ४० हजार
शनिवार-रविवार धावणारी वाहने : ५० ते ६० हजार

दररोज टोलमधून मिळणारे उत्पन्न : अडीच कोटी रुपये

गेल्या २२ वर्षांत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविता आलेला नाही. यासाठी एमएसआरडीसी, आयआरबी, महामार्ग पोलिस हे दोषी आहेत. ९५ किमीच्या प्रवासासाठी प्रवाशांना २७० रुपये भरावे लागतात. एवढ्या कमी अंतरासाठी २७० रुपये घेणे हे भारतात केवळ पुणे-मुंबई मार्गावर घडत आहे.
- संजय शिरोडकर, टोल अभ्यासक, पुणे

मी कधी एसटीने तर कधी टॅक्सीने हा प्रवास केला. वेळेत हा प्रवास पूर्ण झाला असा कधीच अनुभव आला नाही. या मार्गावर एक जरी वाहन बंद पडले तर तुमच्या नियोजनाचे तीन तेरा झाले असे समजा.
- प्रियांका कुलकर्णी, प्रवासी