Thane Municipal Corporation Tendernama
मुंबई

Thane : खोदलेले रस्ते बुजविण्यासाठी पालिका खर्च करणार 25 कोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे महापालिका (TMC) क्षेत्रातील रस्त्यांवर विद्युत तसेच इंटरनेट वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले चर बुजविण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून या कामाचे टेंडर (Tender) प्रसिद्ध करण्यात आले आहे. या कामासाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्ते नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. काँक्रिट आणि डांबर अशा पद्धतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून ही कामे सुरू आहेत. शहरातील काही रस्ते सुस्थितीत असले तरी त्यावर विद्युत किंवा इंटरनेट वाहिन्या टाकण्यासाठी चर खोदण्यात आलेले आहेत. यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

विद्युत किंवा इंटरनेट वाहिन्या टाकण्यासाठी चर खोदण्यासाठी पालिका संबंधित विभागांना परवानगी देते आणि तेथील रस्ते दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडून शुल्कही आकारते. दरवर्षी या शुल्कापोटी पालिकेच्या तिजोरीत अंदाजे ५० कोटी रुपये जमा होता. यंदा २९ कोटी रुपये जमा झालेले असून महिनाभरात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरवर्षी चर खोदाई शुल्कातून जमा झालेल्या रकमेतून चर बुजविण्याची कामे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात येतात. यंदाही पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अशाच प्रकारची कामे हाती घेतली आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील माजिवाडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्य-सावरकर, कळवा, उथळसर, वागळे इस्टेट, नौपाडा-कोपरी, मुंब्रा आणि दिवा या नऊ प्रभाग समिती क्षेत्रातील रस्त्यांवर विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेले चर बुजविण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिकेने टेंडर काढले असून या कामासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

या कामासाठी ६ मार्चपर्यंत टेंडर भरण्याची मुदत होती. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत.