मुंबई (Mumbai) : ठाण्यातील घोडबंदर (Ghodbandar, Thane) भागातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची पादचारी पुलाची मागणी अखेर दृष्टीपथात आली आहे. ठाणे महापालिका (TMC) ब्रह्मांड व वाघबिळ येथे होणाऱ्या पादचारी पुलासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च करणार आहे. नुकताच या दोन्ही पुलांचा कार्यादेश ठेकेदाराला (Contractor) देण्यात आला आहे.
घोडबंदर मार्गावर या परिसरात पादचारी पूल नसल्यामुळे अनेक नागरिकांना व वृद्धांना रस्ता क्रॉस करणे अवघड झाले होते. घोडबंदर रोडवरून भरधाव वाहणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊन काही नागरिकांचे प्राणही गेले होते. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा करून ब्रह्मांड व वाघबिळ येथील पादचारी पुलाचे काम मंजूर करून घेतले.
मेट्रोच्या कामामध्ये कुठेही अडचण होणार नाही अशा प्रकारे ब्रह्मांड येथील पादचारी पुलाची लांबी ५२.२९ मी., रुंदी ३.७८ मी व उंची ५.६५ मीटर ठेवण्यात येणार आहे. वाघबिळ येथील पादचारी पुलाची लांबी ४३.९४ मी., रुंदी ३.७८ मी व उंची ५.६५ मीटर ठेवण्यात येणार आहे. दोन्ही बाजूला चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बनवण्यात येणार आहेत.
हे दोन्हीही पादचारी पूल बांधण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक बाजू तपासून ठाणे महापालिकेला मंजुरी दिली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेने पादचारी पूल उभारण्याच्या कामास गती देत टेंडर प्रक्रिया राबवली आहे.
कासारवडवली, ओवळा, भायंदरपाडा व गायमुख या परिसरामध्ये सुद्धा फूट ओव्हर ब्रीज उभारण्याची मागणी नागरिकांमधून सातत्याने होत आहे, परंतु सध्यपरिस्थितीत ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची नसल्याने उर्वरित चार पादचारी पुलांचा खर्च हा एमएमआरडीएने करावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
ही मागणी मान्य केल्यामुळे पुढील उर्वरित चारही फूट ओव्हर ब्रीज एमएमआरडीएच्या माध्यमातून लवकरच होणार असल्याने घोडबंदर रोडवरील पादचारी पुलाचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.