Mumbai Metro  Tendernama
मुंबई

'मुंबई मेट्रो-3' च्या बाह्य जाहिरातींचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात; 15 वर्षांचा करार...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने टाइम्स इनोव्हेटिव्ह मीडिया लिमिटेडला पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी बाह्य जाहिरातींसाठी अधिकाराचा परवाना दिला आहे. यामध्ये २७ स्थानके ३१ गाड्या, अन्सिलरी इमारतींमधील एकूण वीस हजार चौरस मीटर जागेसह स्थानकांच्या नावांच्या अधिकारांचाही समावेश आहे.

मुं.मे.रे.कॉ. ने यापूर्वी स्थानक नाम अधिकार, टेलिकॉम इन-बिल्डिंग सोल्यूशन्स, ऑप्टिकल फायबर केबल्सची टेंडर काढली आहेत. सुमारे दीड लाख चौरस फुटांच्या व्यावसायिक जागांच्या परवान्यासाठीच्या टेंडर खुली आहेत व त्यास मोठा प्रतिसादही मिळत आहे. मुं.मे.रे.कॉने ऑक्टस ॲडव्हायझर्स-स्टुडिओ POD कन्सोर्टियम यांना सर्व मेट्रो-३ च्या नॉन-फेअर बॉक्सद्वारे होणाऱ्या महसूल प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांसाठी सल्लागार म्हणून नेमले आहे.

मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्ग ३ चे पहिल्या टप्प्याचे कामा सध्या अंतिम टप्प्यात आहे. कफ परेड ते आरे पर्यंत २७ स्थानकांद्वारे हा मेट्रो मार्ग जोडला गेला आहे. ही मार्गिका बीकेसी, विमानतळ टर्मिनल १ आणि टर्मिनल २, वरळी, दादर, सिद्धिविनायक, सीएसएमटी, चर्चगेट, हुतात्मा चौक आणि विधान भवन यांसारख्या शहरातील प्रमुख ठिकाणांना जोडते. भारतातील इतर मेट्रो मार्गिकांच्या तुलनेत मेट्रो मार्ग ३ सर्वाधिक प्रवाशांच्या पसंतीस उतरेल असे अपेक्षित आहे. बाह्य जाहिरातींसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली, ज्यामध्ये सहा कंपन्यांनी सहभाग घेतला यामध्ये टाईम्स ooh ही कंपनी विजेती ठरली.