मुंबई (Mumbai) : वांद्रे स्थानक ते दिवाणी न्यायालयापर्यंतचा मुंबईतील पहिला स्कायवॉक अखेर जमीनदोस्त करण्यात आला आहे. या स्कायवॉकची नव्याने उभारणी करण्यासाठी १६ कोटी रुपये खर्च येणार असून, मुंबई महापालिकेने यासाठी टेंडर प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नेमूणक केली आहे. याचे काम ऑक्टोबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) कोट्यवधी रुपये खर्च करून वांद्रे स्थानक ते कलानगर आणि वांद्रे न्यायालयापर्यंत स्कायवॉक उभारल्याने पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. वांद्रे ते न्यायालयातपर्यंचा स्कायवॉक व्हीजेटीआयने धोकादायक असल्याचा अहवाल देताच महापालिकेने स्कायवॉक तोडून नव्याने उभारण्याचा निर्णय घेतला. स्कायवॉक तोडून नव्याने उभारण्यासाठी १६ कोटी रुपये खर्च येणार असून, यासाठी टेंडर प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नेमूणक केली आहे. मात्र पावसाळा सुरू होणार असल्याने हे काम तूर्तास थांबवण्यात आले आहे. हे काम ऑक्टोबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. ते दीड वर्षात पूर्ण होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) जाण्यासाठी पूल उभारण्यासाठी एमएमआरडीएने स्कायवॉक तोडण्याची परवानगी महापालिकेकडून घेतली. त्यानुसार स्कायवॉक उभारण्यासाठी खर्च देण्याचे एमएमआरडीएने मान्य केले; मात्र आजवर एमएमआरडीएने हा स्कायवॉक उभारण्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. स्कायवॉक धोकादायक झाल्यानंतरही तो आजवर हटवण्यात आला नसल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याबाबत एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आणि सह महानगर आयुक्त राहुल कर्डिले यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
एमएमआरडीएने २०१५ मध्ये स्कायवॉकच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे सोपवली. त्यानंतर महानगरपालिकेने सर्व स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. यामध्ये अनेक स्कायवॉकची दुरुती करण्याची शिफारस संस्थेने केली. त्याप्रमाणे महापालिकेने पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पूर्व-पश्चिम येथील स्कायवॉक, गोरेगाव, वांद्रे पश्चिम आणि विलेपार्ले येथील स्कायवॉकची दुरुस्ती केली आहे. हे स्कायवॉक प्रवाशांच्या सेवेत आहेत; मात्र वांद्रे पश्चिम येथील स्कायवॉकची दुरुस्ती होऊनही तो प्रवाशांसाठी खुला होऊ शकलेला नाही. प्रस्तावित एस. व्ही. रोडवर मेट्रो स्थानकाचे काम येथे सुरू आहे. त्यामुळे तेथे उतरण्यास जागा उपलब्ध नाही. या स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत हा स्कायवॉक बंद ठेवण्याची वेळ आली आहे.