मुंबई

मुंबई पूरमुक्त करणाऱ्या 350 कोटींच्या 'या' प्रकल्पाचे टेंडर निघाले

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या शहरी भागाला पूरमुक्त करण्यासाठी माहुल पंपिंग स्टेशनच्या (Mahul Pupping Station) कामासाठीची टेंडर प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेने (BMC) सुरू केली आहे. हे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी ३५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

माहुल पंपिंग स्टेशनसाठी मिठागर आयुक्तांकडून जागा मिळण्यासाठीचे पत्र महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केंद्राला लिहिले आहे. केंद्रातील मिठागर आयुक्तांना याबाबतचा पत्रव्यवहार झाला आहे. केंद्रातील वाणिज्य मंत्रालयाकडे मिठागराची जागा मिळवण्यासाठी पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह यांनी काही दिवसांपूर्वी केंद्राकडे पत्र पाठवले आहे. तर दुसरीकडे माहुल पंपिंग स्टेशनच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेने टेंडर प्रक्रियेला सुरूवात केली आहे. त्यामुळे खाजगी विकासकाकडून जमीन घेण्याचा प्रकल्प आता बारगळण्याच्या दिशेने आहे. मिठागर आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानेच पालिका नव्याने कामाला लागली आहे. मुंबईतील मध्य, पूर्व भागाला पूरमुक्त करण्यासाठी हे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

माहुलच्या पंपिंग स्टेशनमुळे मुंबई शहरातील सायन (गांधी मार्केट), अॅंटॉप हिल, चुनाभट्टी यासारख्या परिसराचा पाणी तुंबण्याचा विषय मार्गी लागणार आहे. माहुल पंपिंग स्टेशनच्या जागेसाठी मुंबई महानगरपालिका गेल्या सहा ते सात वर्षांपासून मिठागर आयुक्तांकडे जागेसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, ही जागा उपलब्ध होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून पालिकेने पर्यायी जागेचा शोध सुरू केला होता. परंतु, मिठागर आयुक्ताकडून जागा देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानेच या जागेसाठी पालिकेने आता पत्र व्यवहार सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिका मिठागराच्या जागेच्या विषयावर थेट केंद्रासोबत पत्रव्यवहार करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे माहुल पंपिंग स्टेशनच्या ६ एकर जागेचा विषय लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

मुंबई महानगरपालिकेने माहुल पंपिंग स्टेशनसाठी मिठागराच्या जागेत प्रकल्प उभा करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. शहरासाठी आवश्यक अशा प्रकल्पाला गती मिळाल्याने आनंद होत आहे. पण वेळीच जागेचा ताबा मिळवण्यासाठी पालिकेकडून पाठपुरावा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे याआधीच्या चुकांमधून टेंडरची प्रक्रिया रखडणार नाही, अशीच अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अपेक्षित असलेली यंदाची टेंडर प्रक्रिया वेळीच पूर्ण होईल, अशी अपेक्षा काँग्रेसचे रवी राजा यांनी व्यक्त केली.