मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) ते भिवंडी (Bhiwandi) महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गाचे काम करीत असताना जलवाहिनी स्थलांतराचा विषय प्रामुख्याने समोर आला आहे. मात्र, ही जलवाहिनी स्थलांतरण कोण करणार या मुद्यावरून मागील दोन वर्षांपासून हे काम होऊ शकलेले नाही. कोविडमुळे ठाणे महापालिकेची (Thane Municipal Corporation) आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असल्याने जलवाहिनीच्या स्थलांतराचा सुमारे ७० ते ८० कोटींचा खर्च कसा करायचा, असा पेच निर्माण झाला आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून येथील महामार्गाचे आठ पदरीचे काम हाती घेण्यात आल्याने जलवाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम त्या संस्थेकडून होणे अपेक्षित असताना त्या कामाचा भुर्दंड ठाणे महापालिकेच्या माथी मारण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली; तर कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असताना जलवाहिनीच्या स्थलांतराचा सुमारे ७० ते ८० कोटींचा खर्च कसा करायचा, या पेचात आहे; तर किमान ५० टक्के तरी द्यावा, अशी मागणीदेखील पालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
मुंबई - नाशिक महामार्गावरील ठाणे ते भिवंडी या महामार्गाचे आठ पदरीचे काम सुरू आहे. या कामाच्या मार्गात ठाणे ते वडपेपर्यंत पालिकेच्या १३०० आणि १००० मि.मी. व्यासाच्या दोन जलवाहिन्या येत आहेत. त्या जलवाहिन्या स्थलांतरीत कराव्या लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेने एक प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार येथील जलवाहिन्या दोनऐवजी एकच करण्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने येथे दोन हजार मि.मी. व्यासाची एकच जलवाहिनी टाकण्याचेही पालिकेने निश्चित केले आहे. यासाठी सुमारे ७० ते ८० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा प्रस्ताव पालिकेकडून सुमारे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे; परंतु त्याला संबंधितांनी परवानगी दिलेली नाही. यासाठी होणारा खर्च हा पालिकेने करावा, असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी येणारा ५० टक्के खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यावा, मागणी पालिकेने केली आहे; मात्र तरीदेखील याबाबत काहीच तोडगा निघू शकलेला नाही. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. अशातच आता जलवाहिनी स्थलांतरणासाठीचा खर्च कसा करावा, या पेचात महापालिका अडकली आहे.