Thane Municipal Corporation Tendernama
मुंबई

Thane News : ठाणेकरांचा पावसाळ्यातील प्रवास खड्ड्यातूनच? कारण काय?

टेंडरनामा ब्युरो

Thane News मुंबई : ठाणे महापालिकेने (TMC) यावर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे (Potholes) भरण्यासाठी अवघ्या दोन कोटीचे टेंडर (Tender) काढले आहे. त्यामुळे यावर्षी ठाणेकरांचा प्रवास खड्ड्यातून होणार असे दिसते.

ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवास करता यावा म्हणून महापालिका प्रशासनाने दोन टप्प्यांत 605 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे सुरू केली. ठाणे शहरातील रस्त्यांची कामे 90 टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. यातील बहुतेक रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी डांबरी रस्त्यांचा समावेश आहे.

शहरातील रस्ते मजबूत झाले असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी मुसळधार पावसात ठाण्यात खड्डे पडत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. यावर्षी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अनुमान असून धो धो पावसात नव्याने केलेले रस्ते किती तग धरतील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडू नये यासाठी महापालिकेने दोन कोटींची तरतूद केली आहे. नऊ प्रभाग समितीअंतर्गत 20 लाख याप्रमाणे ही तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा 50 लाखांनी कमी आहे.

टेंडर प्रक्रिया अंतिम झाली असून ठेकेदारांना वर्कऑर्डरदेखील देण्यात आल्या आहेत. दरम्यान मागील वर्षी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी 2.50 कोटींची तरतूद करण्यात आली होती.

यावर्षी रस्त्यांची कामे केल्याने खड्डे बुजवण्याच्या बजेटमध्ये 50 लाखांची घट करण्यात आली असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे, पण जे रस्ते झाले ते यंदाच्या पावसात किती तग धरतील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

महापालिका हद्दीत असलेल्या इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांना खड्डे पडल्यानंतरही महापालिकेलाच खड्डे बुजविण्याची वेळ येते. मागील वर्षीदेखील त्यांच्या रस्त्यांवरील खड्डे महापालिकेनेच बुजविले होते. यंदाही महापालिकेवर तीच वेळ येण्याची शक्यता आहे.