मुंबई (Mumbai) : कामाचा दर्जा राखण्यासाठी ठाणे शहरातील रस्ते कामांचे थर्ड पार्टी ऑडिट होत असताना आता हा नियम सर्वच विकासकामांसाठी लावण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तसे परिपत्रक काढून ही जबाबदारी कार्यकारी अभियंता, विभागप्रमुखांवर दिली आहे. याशिवाय यात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही दिला आहे. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांच्या खाबुगिरीला मोठा चाप लागणार आहे.
केंद्र, राज्य तसेच शासकीय विभागांमार्फत प्राप्त होणाऱ्या निधीअंतर्गत एक कोटी आणि त्यावरील अंदाज खर्चाच्या सर्व कामांचे देयकनिहाय त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थांमार्फत केले जाईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
महापालिकेमार्फत शहरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामांचा दर्जा चांगला राहावा यासाठी महापालिकेने दक्ष राहणे आवश्यक आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामाचा दर्जा कमी होत असेल तर संबंधित कार्यकारी अभियंता व विभागप्रमुख यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, तसेच महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या इतर कामांचेही त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार 'ब' वर्ग महापालिकांमध्ये तीन कोटींच्या सर्व कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी कार्यकारी अभियंता, विभागप्रमुख यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे, पण एक पाऊल पुढे टाकत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्वच विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तांत्रिक लेखापरीक्षण न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. शासन निर्णयानुसार ठाणे महापालिकेच्या तालिकेवरील मंजूर टेंडरअंतर्गत करण्यात आलेल्या त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण सल्लागार संस्थांमार्फत कार्यवाही करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
केंद्र, राज्य तसेच शासकीय विभागांमार्फत प्राप्त होणाऱ्या निधीअंतर्गत एक कोटी आणि त्यावरील अंदाज खर्चाच्या सर्व कामांचे देयकनिहाय त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थांमार्फत केले जाईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. यामुळे संबंधित कामांचा दर्जा उत्तम राखण्यात मदत होईल, तसेच सर्व मोठ्या कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण केल्यामुळे जो संस्थात्मक बदल होईल त्यातून कामकाजामध्ये दुर्लक्ष किंवा अप्रमाणिक हेतूने कामाचा दर्जा कमी ठेवण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.