Thane Tendernama
मुंबई

ठाणे महापालिकेकडून तपासणी अहवालानंतरच 81 इलेक्ट्रिक बस खरेदी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा, या उद्देशातून ८१ इलेक्ट्रीक बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसगाड्यांची बॅटरी तसेच इतर तांत्रिक बाबी तपासणीचे काम मागील काही दिवसांपासून सुरु असून, हे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या तपासणी अहवालानंतरच बस खरेदीचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील २७७ बसगाड्या शहरातील ९८ मार्गांवर चालविण्यात येत आहेत. त्यात टीमटीच्या स्वत: च्या ६७ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित जीसीसी तत्वावर ठेकेदारामार्फत चालविण्यात येणाऱ्या बसगाड्यांचा समावेश आहे. शहरातील प्रवाशी संख्येच्या तुलनेत टीएमटीच्या ताफ्यातील बसगाड्या अपुऱ्या पडत आहेत. यामुळे या बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर परिवहन समिती तसेच महापालिका प्रशासनाकडून भर दिला जात आहे. असे असतानाच केंद्र आणि राज्य सरकारकडून स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत टीएमटीला वीजेवरील बस खरेदी करण्यासाठी ३८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता.

या निधीतून ८१ वीजेवरील बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बस खरेदीसाठी महापालिकेने टेंडर काढले होते. त्यात दोन कंपन्यांचे टेंडर प्राप्त झाले असून या कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या बसगाड्यांची तपासणी महापालिकेने सुरु केली आहे. यासाठी महापालिकेने एका कंपनीची नेमणूक केली आहे. शहराच्या विविध भागात ही बसगाडी चालविण्यात येत असून त्यात प्रवासी वाहतूक क्षमता, बॅटरी क्षमता तसेच इतर तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत. नुकताच आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी या बसमधून प्रवास केला.

ठाणे शहरातील ९८ पैकी ९५ टक्के मार्ग २० किमीपेक्षा कमी अंतराचे आहेत. उर्वरित मार्ग शहराबाहेरील असून ते २० किमीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे शहरातील अंतर्गत मार्गांवर साध्या बसगाड्या चालविण्याचा तर बाहेरील मार्गावर वातानुकूलित बसगाड्या चालविण्याचा विचार करून ४१ वातानुकूलीत तर ४० साध्या बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय परिवहन समितीच्या सभेत घेण्यात आला होता. या निर्णयानुसार नऊ मीटरच्या २६ तर १२ मीटरच्या १५ वातानुकूलित बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहे. तर नऊ मीटरच्या ३० साध्या बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.