Mumbai Tendernama
मुंबई

Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात यावर्षी 200 ई-बस धावणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) परिवहन सेवेत नवीन येणाऱ्या इलेक्ट्रिक बसची ठाणेकरांची प्रतीक्षा संपली आहे. 26 जानेवारी रोजी पहिल्या दोन बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. पाठोपाठ फेब्रुवारी अखेरपर्यंत एकूण 123 बस सेवेत दाखल होणार आहेत. वर्षभरात किमान २०० इलेक्‍ट्रिक बस घेण्याचा परिवहनचा मानस आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या मोहिमेअंतर्गत शहरातील रस्त्यांची कामे महापालिकेने युद्ध पातळीवर हाती घेतली आहेत. दुसऱ्या टप्प्यात येत्या ४ फेब्रुवारीपासून 391 कोटीतून महापालिकेने 157 रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. ठाणे शहरातील झपाट्याने होणारा विस्तार त्याचबरोबर नागरिकीकरण यांमुळे शहराच्या लोकसंख्येत देखील वाढ होत आहे. ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि पर्यावरणस्नेही व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने प्रदूषणविरहित अशा विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार पर्यावरणाचा समतोल राखला जावा, याकरिता महापालिका आणि नगरपालिका यांना विविध उपाययोजना करण्यासाठी निधी देण्यात येत असतो. त्यानुसार ठाणे महापालिकेस १२३ इलेक्‍ट्रिक घेण्यासाठी ५८ कोटी १० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार टप्‍प्याटप्‍प्याने या बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याचा परिवहनचा मानस आहे. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या अखेरीस ३२ बस परिवहनच्या सेवेत दाखल होणार आहेत. सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. परिणामी, याचा फटका इलेक्‍ट्रिक बसच्या उदघाटनाला बसण्याची शक्यता होती. पण नागरिकांना अधिकची बस सेवा उपलब्ध व्हावी. या उद्देशाने परिवहनने यातून मार्ग काढला आहे.

त्यानुसार आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा न करता, जस जशा या बस परिवहनला प्राप्त होतील तशा त्या ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याचा ठाणे परिवहनचा मानस आहे. इलेक्‍ट्रिक बस पाठोपाठ सीएनजीच्या देखील २० बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्‍प्यात १० आणि दुसऱ्या टप्‍प्यात १० अशा एकूण २० बस दाखल होणार आहेत. त्यानुसार या बसची सेवा ९ फेब्रुवारी अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्याचा मानस परिवहनचा आहे.

तसेच ठाणे शहरात 4 फेब्रुवारी पासून एकाच वेळी 157 रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. एकाच वेळी ही कामे सुरू झाल्यास वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या मोहिमेअंतर्गत शहरातील रस्त्यांची कामे महापालिकेने युद्ध पातळीवर हाती घेतली आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 214 कोटींची 127 रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. त्यातील बहुतेक कामे आता टप्प्यात आली असून ती लवकरच पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. दुसऱ्या टप्प्यात 391 कोटीच्या माध्यमातून महापालिकेने पुन्हा 157 रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत.

२६ जानेवारी रोजी परेडच्या दिवशी दोन बस रस्त्यावर धावणार आहे. टप्‍प्याटप्याने या महिना अखेरीस ३२ बस सेवेत दाखल होतील. तर फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वच बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. वर्षभरात किमान २०० इलेक्‍ट्रिक बस घेण्याचा परिवहनचा मानस आहे.
- विलास जोशी, सभापती, ठाणे परिवहन.