Hospital Tendernama
मुंबई

ठाण्यातील कौसा रुग्णालयाचा खर्च २७ कोटींवरुन १४७ कोटींवर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाण्यातील (Thane) मुंब्रा (Mumbra) तसेच दिवावासियांना सोयीचे ठरावे यासाठी कौसा येथे १०० बेडचे ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) रुग्णालय उभारणीचा निर्णय घेतला. २०१३ साली मंजुरी मिळाल्यानंतरही या रुग्णालयाचे काम संथगतीने सुरु असून आतापर्यंत मंजूर निधीपेक्षा पाचपट वाढीव खर्च करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यावेळी या रुग्णालयासाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, वाढीव कामांची सबब देत महापालिकेने या रुग्णालयासाठी तीन वेळा स्वतंत्र टेंडर प्रक्रिया राबवून कामाचा खर्च तब्बल १४७ कोटींवर नेऊन ठेवला आहे.

विशेष म्हणजे, तिन्ही टेंडर प्रक्रियांमध्ये एकच ठेकेदार पात्र ठरला आहे तरी सुद्धा रुग्णालयाचे अद्यापही लोकार्पण झालेले नाही. कौसा येथे रुग्णालय उभारणीसाठी राज्य सरकारकडून अर्थसहाय्य मिळणार असल्याची सबब देत सेक्टर ९ येथील आरक्षित जागेवर रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव २०१३ साली सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. या कामासाठी २७ कोटी २४ लाख रुपये खर्चाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती.

त्यानंतर २०१४ साली या कामासाठी ५४ कोटी ३८ लाख रुपये खर्चाची मान्यता देण्यात आली. हे काम ३० महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काम पूर्ण होत असताना रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढीव कामांचा प्रस्ताव २०१८ साली पुन्हा सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. त्यावेळी सुमारे साडेचार हजार चौरस फूट वाढीव क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी ६३ कोटी ६३ लाख रुपये खर्चाची मंजूरी देण्यात आली. त्याहूनही कहर म्हणजे हा खर्च झाल्यानंतर रुग्णालयातील अंतर्गत कामांसाठी आणखी २८ कोटी ५० लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला असून ७ एप्रिल, २०२१ ला झालेल्या सर्वसाधारण सभेत या वाढीव कामालाही वादग्रस्त पद्धतीने मंजूरी देण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पात या रुग्णालयाच्या २८ कोटींच्या वाढीव खर्चासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. सर्वसाधारण सभेने ३१ मार्चपूर्वी मंजूर केलेल्या अर्थसंकल्पावर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सह्या करुन अद्याप प्रशासनाला सादर केलेला नाही. त्यामुळे आयुक्तांच्या अर्थसंकल्पानुसारच सध्या कामकाज सुरु आहे. मात्र, नगरसेवकांना अंधारात ठेवून २८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आयत्यावेळच्या विषयात आणून त्याला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला आहे. इतकेच नव्हेतर कौसा रुग्णालयाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दोन महिन्यांपूर्वी साडेसात कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आहे होते. तसेच, नव्याने मंजूर केलेल्या २८ कोटी रुपयांपैकी काही कामांची बिले अदा करण्याचा घाटही अधिकाऱ्यांनी घातल्याचा आरोप पेंडसे यांनी केला आहे.