Illegal encroachments Tendernama
मुंबई

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; आयुक्तांची कारवाई

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील बेकायदा बांधकामांची पाहणी करत त्याठिकाणी हातोडा मारण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत कळवा, मुंब्रा, दिवा यासह घोडबंदर भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. शहरात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकांनी ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभारली आहेत. ठाण्यातील या अनधिकृत बांधकामांच्या विषयाला 'टेंडरनामा'ने गेल्यावर्षी राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वाचा फोडली आहे. "ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमागे २०० रुपये चौरस फूट रेट फिक्स" हे वृत्त टेंडरनामाने प्रसिद्ध केले होते. अनधिकृत बांधकामांप्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या ११ सहायक आयुक्त तथा वॉर्ड ऑफिसर्सची खात्याअंतर्गत चौकशी 'डीई' सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्यात तब्बल एकेक कोटींचा मलिदा पचवलेले वरिष्ठ मोकाट आणि तुलनेत कनिष्ठ सहाय्यक आयुक्तांना मात्र बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. याप्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. आव्हाड यांनी या अनधिकृत बांधकामांमागचे अर्थकारण सुद्धा उघड केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी हाती घेतली होती. यामध्ये अनेक बेकायदा इमारतींची बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. यामध्ये काही इमारतींवर कारवाई करण्यात येत नसल्याच्या तक्रारी होत्या. तसेच गेल्या काही दिवसांपासून महापालिकेची कारवाईही थंडावली होती. या मुद्द्यावरून महापालिकेवर टिका होत होती. त्यातच महापालिकेची यंत्रणा निवडणूक काळात व्यस्त झाल्याने काही ठिकाणी बेकायदा इमारती उभारणीची कामे पुन्हा सुरू झाली होती. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनावर टीका केली होती. त्याचबरोबर शहरात होत असलेल्या बेकायदा बांधकामाच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त होऊ लागल्या होत्या. यामुळे आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त करत बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी जीपीएस सॅटेलाईट प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीकोनातून बेकायदा बांधकामे हटवण्याची मोहीम १५ एप्रिल पासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिले. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील बेकायदा बांधकामांची पाहणी करत त्याठिकाणी हातोडा मारण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत कळवा, मुंब्रा, दिवा यासह घोडबंदर भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

कळव्यातील बुधाजी नगरमधील इमारतीच्या एका मजल्याचे बांधकाम, मुंब्रा येथील संजय नगरमधील पाच माळ्यांच्या इमारतीचा ३, ४ आणि ५ मजल्याचे बांधकाम, दिवा श्लोक नगर येथील दोन इमारतीच्या पायाचे बांधकाम आणि फडकेपाडा येथील गोदामाच्या बांधकामावर हातोडा मारण्यात आला. तसेच घोडबंदर येथील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील मोघरपाडा, तलावाच्या शेजारी सुनिल सिंग यांच्या तळ अधिक २ मजली इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली.