Thane Metro Tendernama
मुंबई

Thane Metro: CM शिंदेंनी दिली गुड न्यूज! ठाणे वर्तुळाकार मेट्रो सुसाट!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या (Thane Metro) कामास गती देण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक १२ हजार २२० कोटी १० लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते. या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी २९ किलोमीटर असून, २० स्थानके उन्नत व २ भूमिगत आहेत.

येत्या काही वर्षांत ठाण्याची लोकसंख्या २७ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन सेवेसह शहराच्या अंतर्गत वाहतुकीच्या पर्यायांची चर्चा होत आहे. यातूनच सुरवातीला वर्तुळाकार मेट्रोनंतर एलआरटी आणि पुन्हा अंतर्गत मेट्रो अशा पर्यायांची चर्चा होत आहे.

अंतर्गत मेट्रो खर्चिक असल्याने केंद्राने एलआरटी प्रकल्पाला पसंती दर्शवली होती, पण वाढती प्रवासी संख्या पाहता ठाणे महापालिका अंतर्गत मेट्रोवर ठाम राहिली. त्या अनुषंगाने डीपीआर बनवून तो राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठवला. २०२३ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला होता.

२ जानेवारी रोजी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी यासंदर्भात एक बैठकही घेतली होती, तर हे काम एमएमआरडीएकडे देण्याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राला पत्रदेखील दिले होते.

शासन स्तरावर या पत्राचा पाठपुरावा महापालिका प्रशासनातील अधिकारी करत होते, परंतु सौरभ राव यांनी ठाणे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिले आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचा पाठपुरावा केला आहे. त्यानुसार केंद्र सरकारने प्रस्ताव तयार केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पहिल्या शंभर कामांमध्ये ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला स्थान दिले आहे. त्यामुळे या वर्षअखेरपर्यंत या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे महापालिकेतील उच्चपदस्थांनी सांगितले.

ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोचे काम महामेट्रोऐवजी एमएमआरडीए करणार आहे. एकूण २९ किमी लांबीचा हा मार्ग असून तीन किमीपर्यंतचा मार्ग हा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर १३ स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. नवीन विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक येथून या वर्तुळाकार मेट्रोची सुरुवात होणार आहे. वागळे इस्टेट, लोकमान्य, शिवाईनगर, गांधीनगर, मानपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत, बाळकूम, राबोडी आणि ठाणे रेल्वे स्थानक असा मेट्रोचा मार्ग आहे. त्यापैकी दोन स्थानके भुयारी करण्याचे प्रस्तावित आहे.

मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या मेट्रो-४ चे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य मेट्रो-४ ला जोडणाऱ्या या मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे.