Theme Park

 

Tendernama

मुंबई

मुंबई उपनगरात चार थीम पार्क साकारणार; २५ कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : उपनगरातील चार ठिकाणी संकल्पना उद्यान (थीम पार्क) उभारण्यात येणार आहेत. घाटकोपर येथे सायन्स पार्क, विक्रोळीत मेडीटेशन पार्क, चारकोप येथे ट्राफिक पार्क आणि दहिसर येथे बहुक्रीडा पार्क अशा चार थिमवर चार उद्याने, मैदाने विकसित केली जाणार आहेत. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना नजरेसमोर ठेवून या पार्कची रचना करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने टेंडर मागवली असून सुमारे 25 कोटी 65 लाख रुपयांचा अंदाजित खर्च आहे. जिल्हा नियोजन समितीने या उद्यांनासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.

उपनगरात पर्यटन वाढीसाठी विविध उपाय करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे महानगर पालिकेच्या नियोजन विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. विक्रोळी पश्‍चिमेला टेकडीवर असलेल्या प्रबोधनकारक ठाकरे उद्यानात अनवाणी मेडिटेशन संकल्पनेवर आधारीत उद्यानाचा विकास केला जाणार आहे. 28 हजार 487 चौरस मीटरच्या उद्यानात सेन्सरी ट्रॅक असेल. अनवाणी चालण्यासाठी ट्रक असेल रॉक क्लायम्बिंगसह अनेक खेळांसाठीही जागा राखून ठेवण्यात येणार आहे. त्याच बरोबर व्यायामाचीही साधने असतील. वाळू, मऊ माती, गवतातून चालण्याची सोय असेल.

घाटकोपर पश्‍चिमेला लाल बहादूर शास्त्री मार्गाजवळील उद्यानात खेळातून विज्ञानाची ओळख या संकल्पनेवर आधारीत पार्क तयार करण्यात येणार आहे. विज्ञानाशी संबंधित असलेल्या विविध साहित्याच्या प्रतिकृती उभारण्यात येतील. तसेच, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांसाठीही जागा ठेवण्यात येणार आहे. मानवी सावलीवर वेळ दाखविणारे घड्याळही तयार करण्यात येणार आहे. चारकोप येथील राजे शिवाजी मैदानात ट्राफिक पार्क तयार करण्यात येणार आहे. लहान मुलांना रहदारीच्या नियमांची ओळख व्हावी या पध्दतीने हे उद्यान तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाळीव प्राण्यांना बागडण्यासाठीही जागा ठेवण्यात येईल. खुली व्यायामशाळाही या उद्यानात असेल. सुमारे 8 हजार चौरस मीटरवर हे उद्यान तयार होणार आहे.

दहिसर गावठाण येथील गावदेवी मैदानात बहुक्रीडा पार्क तयार करण्यात येणार आहे. यात विविध क्रिडा प्रकारांसाठी मैदानं तयार करण्यात येणार आहे. लहान मुलांना खेळण्यासाठीही स्वतंत्र मैदान असेल. क्रिकेट, व्हॉलीबॉल या खेळांसह कबड्डीसाठीही मैदान असेल. तसेच, लहान मुलांना खेळण्यासाठी वाळूचे मैदान तयार करण्यात येईल. त्याचबरोबर खुली व्यायामशाळाही असेल. सुमारे 4 हजार 975 चौरस मीटर क्षेत्रफळावर हे उद्यान साकारणार आहे.