Manora Tendernama
मुंबई

'मनोरा' पुनर्विकासासाठी लवकरच ऑफर टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नरिमन पॉईंट येथील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासासाठी तीन कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. बांधकाम क्षेत्रातील टाटा, एल अँड टी आणि शापूरजी पालनजी या कंपन्या पुनर्विकासासाठी पुढे आल्या आहेत. त्यानुसार येत्या दहा दिवसात आमदार निवासाच्या पुनर्विकासासाठी ऑफर टेंडर (Tender) काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेत या तीन कंपन्यांपैकी कमी रक्कमेत चांगले बांधकाम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या कंपनीला हे काम देण्यात येणार आहे.

टेंडरनामाने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. आमदारांच्या निवासासाठी उभारलेले मनोरा आमदार निवास 2017 मध्ये अतिधोकादायक इमारतींच्या यादीत गेले. इमारतीचा काही भाग कोसळल्याने याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने निवासाच्या पुनर्विकासाचे काम नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनकडून (एनबीसीसी) काढून घेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविले आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाने पूर्व टेंडर मागविल्या होत्या. प्रथम या टेंडरला प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीनंतर तीन कंपन्यांनी टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद दिला.

बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या टाटा, एल अँड टी आणि शापूरजी पालनजी या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यानुसार पुढील 10 दिवसात या तीन कंपन्यांकडून ऑफर टेंडर मागविण्यात येणार आहे. यामध्ये जी कंपनी कमी रक्कमेत चांगले आमदार निवास उभारुन देईल, त्या कंपनीची अंतिम निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कंपनी कामाला सुरुवात करेल. 'मनोरा' पुर्नविकासासाठी ९०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.