मुंबई (Mumbai) : सध्या रेवस आणि काशिद येथे साध्या बोटीतून प्रवास करता येतो. परंतु लवकरच येथे प्रवाशांना आपल्या वाहनांसकट बोटीतून प्रवास करता येणारी रो-रो बोट सेवा सुरू होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे (Mumbai Port Trust) अध्यक्ष राजीव जलोटा (Rajiv Jalota) यांनी दिली. तसेच नेरूळ येथेही सिडकोच्या मदतीने जेट्टी बांधण्याचे काम सुरू असून, भविष्यात नेरूळ येथून रो-रो बोट सेवा सुरू करण्याची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
क्रुझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत येत्या 14 व 15 मे रोजी पहिली 'इनक्रेडीबल इंडिया - इंटरनॅशनल क्रुझ कॉन्फरन्स' आयोजित करण्यात आली असून त्याची माहिती देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी समुद्र पर्यटनाकडे सध्या कल वाढत असून, डोमेस्टिक क्रुझना मागणी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोठ्या आकाराच्या वॉटर टॅक्सी सेवेला पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. गेट वे येथे थांबा देण्याची मागणी आहे. गेट वे येथील जेटीची क्षमता संपूर्णपणे वापरली जात आहे. गेट वेच्या रेडिओ क्लब येथे नवीन जेट्टी उभारण्यास 'सागरमाला' प्रकल्पांतर्गत मंजुरी मिळाली असून निधीही मंजूर झाला आहे. लवकरच त्याचे टेंडर काढण्यात येत आहे. नेरूळ येथे सिडकोच्या वतीने जेट्टीचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. नेरूळची जेट्टी भविष्यात रो-रो बोटीच्या सेवेसाठी उपयोगी पडण्याच्या दृष्टीने सुसज्ज करण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
समुद्र पर्यटनाची मागणी दिवसेंदिवस वाढतच असून इंटरनॅशनलपेक्षा 'डोमेस्टिक टुरिझम'ला प्रोत्साहन देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. मोठ्या क्रुझऐवजी कॉर्डिलियासारख्या छोट्या क्रुझची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार सबसिडी देणार असल्याचेही राजीव जलोटा यांनी सांगितले.
मुंबई इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनलचे काम वेगाने सुरू असून 2024 पर्यंत ते वापरात येणार आहे. देशात नजीकच्या काळात चार दशलक्ष क्रुझ पर्यटक येणार असून त्यापैकी 3.2 दशलक्ष पर्यटक मुंबईला भेट देतील असा अंदाज आहे. कोरोनानंतर सध्या क्रुझ टुरिझमची 34 टक्के वाढ झाली असून 2023 पर्यंत टुरिझममध्ये दहापट वाढ होणार असल्याचे केंद्रीय पोर्ट, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत सांगितले.