Shiv Mandir Tendernama
मुंबई

'टेंपल सिटी' सुशोभीकरणासाठी 140 कोटीचा आराखडा; सल्लागारासाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अंबरनाथ शहरातील शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास लवकरच केला जाणार आहे. 140 कोटी खर्चाचा हा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडे अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या शहरातील सर्व चौकांचे आणि मोठ्या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने टेंडर प्रसिध्द केले आहे. ही नेमणूक तीन वर्षांसाठी केली जाणार आहे.

संपूर्ण अंबरनाथ शहर सुशोभित करण्याचा आणि शहराची ओळख राष्ट्रीय स्तरावर मंदिरांचे शहर अर्थात टेंपल सिटी म्हणून करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. त्यानुसार शहरातील शिलाहारकालीन वास्तू वैभवाला साजेसे असे चौक आणि रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहेत. गटार आणि पायवाटांव्यतिरिक्तही शहराचा विकास कसा साधता येतो हे खासदार शिंदे यांनी गेल्या काही वर्षात राबवलेल्या प्रकल्पांमधून दाखवून दिले आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात 963 वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. या प्राचीन वास्तूच्या माध्यमातून अंबरनाथ शहराची ओळख प्रभावीपणे स्थापित करण्याच्या दृष्टीकोनातून मंदिरालगतच्या परिसराचा विकास करण्यात येत आहे.

या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन व्हावे. पुढील पिढ्यांना मंदिराची यथायोग्य महती कळावी. जगभरातील पर्यटकांनी या स्थळाला भेट द्यावी म्हणून राज्य सरकारने शिवमंदिर परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेऊन निधीही मंजूर केला आहे. सुशोभीकरण आराखडाही तयार आहे. 140 कोटी रूपये खर्चाचा हा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पात आधुनिक शुटींग रेंज, सुसज्ज नाट्यगृह, क्रीडा संकुल हे प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. गेली पाच वर्षे आयोजित केला जाणार्‍या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलने देशभरातील कलावंत आणि रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता शिवमंदिराच्या कलासंपन्न वास्तुकलेला साजेसे शहरातील विविध चौक आणि रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथ शहर टेंपल सिटी म्हणून ओळखली जाईल. त्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने टेंडर प्रसिध्द केले आहे. प्राचीन शिवमंदिराच्या वास्तूशैलीला साजेसे चौक आणि रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागाराची नेमणूक तीन वर्षांसाठी केली जाणार आहे.

अंबरनाथ शहर प्राचीन शिवमंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या मंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. शहरात इतर अनेक प्रकल्पही सुरू आहेत. येत्या काळात अंबरनाथ शहराची जागतिक पातळीवर मंदिराचे शहर म्हणून ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.
- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा