मुंबई (Mumbai) : देशात अपारंपरिक ऊर्जेची मागणी दिवसोंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरने (Tata Power) देशभरात तब्बल २८०० मेगावॅट क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प पुढील चार वर्षांत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तसेच या वीज प्रकल्पामुळे वीज वितरण कंपन्यांना आपली अपारंपरिक ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे.
देशात औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांचा वीज वापर वाढत आहे. त्यामुळे वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अपारंपरिक म्हणजे सौर, पवन आणि जलविद्युत वीज निर्मितीवर भर दिला आहे.
महाराष्ट्रात जवळपास २० हजार मेगावॅट क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी पोषक भौगोलिक परिस्थिती आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशभरात २८०० मेगावॅटचे उदंचन प्रकल्प उभारणार असल्याची माहिती टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीर सिन्हा यांनी सांगितले. या प्रकल्पात तयार होणारी वीज वितरण कंपन्यांना पुरवली जाणार आहे.
सध्या पाणी टंचाईमुळे जल विद्युत ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे वीज कंपन्यांनी उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पात एकाच पाणी साठ्यावर वारंवार वीज निर्मिती करणे शक्य होते. त्यासाठी एक तलाव उंचावर तर दुसरा खालच्या बाजूला असणे अवश्यक असते.
विजेची मागणी जास्त असताना वरील तलावात असलेल्या पाण्याच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. तेव्हा वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी खालच्या बाजूला असलेल्या तलावात साठवले जाते. जेव्हा रात्रीच्यावेळी विजेची मागणी कमी असते तेव्हा पंपाच्या माध्यमातून हे पाणी वरील बाजूला असलेल्या तलावात टाकले जाते.