मुंबई (Mumbai) : मुंबई विभागातील सर्व आगारांतील बसची स्वच्छता करण्यासाठी एसटी प्रशासनाने (ST Mahamandal) टेंडर काढले आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी नोंदणीकृत सेवा संस्थेला स्वच्छतेचे काम देण्यात येणार आहे. डेपोमधील बसचे डीप क्लिनिंग केले जाणार आहे. रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ ठेवण्यावर एसटीने भर दिला आहे.
प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ प्रवास देण्याच्या उद्देशाने मुंबई विभागाने बस स्वच्छतेचे कंत्राट काढल्याचे सांगण्यात आले. ५ एप्रिल रोजी त्याबाबतचे टेंडर जाहीर करण्यात आले असून, २१ एप्रिलपर्यंत कंत्राट निश्चित करून बसची स्वच्छता सुरू केली जाणार आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कंबर कसली आहे.
प्रवासी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने बसची स्वच्छता, टापटीप, बसस्थानके आणि स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बस, बसस्थानक व परिसर आणि प्रसाधनगृहे स्वच्छ व टापटीप ठेवण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला आहे.
एसटी प्रशासनाच्या सूचना
- महामंडळाचे सफाई कर्मचारी नसलेल्या ठिकाणी स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार कंत्राटी कामगार नेमून स्वच्छता करून घ्यावी.
- गरज पडल्यास टेंडर प्रक्रिया राबवून विभागीय स्तरावर स्वच्छता संस्था नेमण्यात यावी.
- स्वयंचलित बस धुलाई यंत्र नसलेल्या आगारात ते जोडण्यात यावे.
- बसची आंतर्बाह्य स्वच्छता करणे, बसच्या खिडक्या सरकत्या व पारदर्शक ठेवणे, खराब खिडक्या त्वरित बदलून घेणे, गळक्या बस मार्गस्थ होणार नाहीत याची दक्षता घेणे आणि बसमधील आसने सुस्थितीत असतील याची दक्षता घ्यावी.
- फाटलेल्या सीट तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात. बसचा रंग आंतर्बाह्य उडाला असल्यास रंगरंगोटी करून घ्यावी.