ST Tendernama
मुंबई

लालपरीचे पंख आणखी विस्तारणार; एसटीच्या ताफ्यात २ हजार साध्या बस...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या ताफ्यात लवकरच डिझेलवर चालणाऱ्या दोन हजार साध्या गाड्या येणार असून, सध्या त्याची टेंडर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात १५ हजार ८७७ हजार गाड्या असून त्यापैकी १२ हजार ८२८ साध्या बस आहेत. याशिवाय ४२१ हिरकणी, २१७ विना वातानुकूलित तर उर्वरित वातानुकूलित बस, मिडी, मिनी बस आहेत. येत्या काही महिन्यांत साध्या बसची ही संख्या वाढणार आहे. एसटीमध्ये दोन हजार जुन्या गाड्यांची पुनर्बांधणी करण्यात आली. आता ७०० बसची ऑर्डर देण्यात आली आहे. त्या लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार आहे. आणखी दोन हजार साध्या गाड्या वाढविण्याचे एसटीचे नियोजन असून त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १६ हजार बस आहेत. त्यापूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसगाड्या होत्या. गेल्या तीन वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत. मात्र, आयुर्मान संपुष्टात आलेल्या गाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बस अभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महामंडळाने बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला.

आता ७०० बसची ऑर्डर देण्यात आली आहे. त्या लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. डिझेलवरील आणखी दोन हजार गाड्या घेण्याचे नियोजन आहे. त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ