Thane Tendernama
मुंबई

ठाण्यातील 'त्या' पायाभूत प्रकल्पांसाठी 6 बलाढ्य कंपन्या रेसमध्ये

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काढलेल्या ठाण्यातील ८ पायाभूत प्रकल्पांसाठी ६ बलाढ्य कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. एमएमआरडीएने टेक्निकल टेंडर खुले केले असून आठ प्रकल्पांसाठी अशोका बिल्डकॉन, जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट, नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, अॅप्को इन्फ्राटेक, ईगल इन्फ्रा या कंपन्यांनी २५ टेंडर सादर केली आहेत.

एमएमआरडीएने लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी या प्रकल्पांसाठी टेंडर काढली आहेत. ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी तब्बल १२ हजार कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. त्यामध्ये पूर्व द्रुतगती मार्गाचा विस्तार करण्यासाठी छेडा नगर ते ठाणे उन्नत मार्ग, तसेच पुढे आनंदनगरपर्यंत उन्नत मार्गाची उभारणी करण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत. तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे आणि भिवंडी परिसरात खाडीपुलांची उभारणी केली जाणार आहे. दरम्यान यातील सहा प्रकल्पांच्या टेक्निकल टेंडर तांत्रिक कारणामुळे जूनमध्ये रद्द करण्यात आले होते. तसेच त्या प्रकल्पांसाठी पुन्हा नव्याने टेंडर काढण्यात आली होती. आता या प्रकल्पांसाठी टेक्निकल टेंडर उघडण्यात आले. त्यामध्ये सहा कंपन्यांनी २५ टेंडर भरल्याचे समोर आले.

असे आहेत प्रकल्प -
- आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग - १६०० कोटी

- पूर्व द्रुतगती मार्गाचा छेडानगर येथून ठाण्यापर्यंत विस्तार प्रकल्प - २५६० कोटी

- कासारवडवली ते खारबाव खाडीपुल - १४५३ कोटी

- कोलशेत ते भिवंडीतील काल्हेर खाडीपुल - २७४ कोटी

- एनएच ४ ते कटाई नाका उन्नत मार्ग - १८८७ कोटी

- कल्याण मुरबाड रोड ते बदलापूर ते पुणे लिंक रोड ते वालधुनी नदी कर्जत कसारा रेल्वे मार्गावरून रस्ता - ६४२ कोटी

- गायमुख ते पायेगाव खाडीपुल - ९२९ कोटी

- ठाणे कोस्टल रोडचा बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग - २५९७ कोटी